मिंधे सरकारला जागं करण्यासाठी…! मराठा आंदोलकांचं शिट्ट्या वाजवून जोरदार आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. मात्र सरकार ढिम्म आहे. याविरोधात मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी शिट्ट्या वाजवून अनोखं आंदोलन केलं. यावेळी बहिरे सरकार जागे व्हा, मराठा समाजाला आरक्षण द्या! अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

‘मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं सर्व समाज बांधवांना आवाहन केलं आहे. शांततेच्या मार्गानं आंदोलन हे सुरूच राहणार. सरकार झोपलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार असोत. अजित पवार तर मराठ्यांच्या विरोधात जात असून त्यांना मराठ्याचा रोष परवडणार नाही’, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील यांनी दिला. ‘तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही मोदी-शहांची दारं ठोठावता आणि समाजासाठी काही करत नाही. आता 40 वर्ष झाली, पण आता आम्ही कुणाला सोडणार नाही, असंही विजय काकडे पाटील म्हणाले.

‘सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 30 दिवसांची मुदत मागितली होती. त्यांना पाटलांनी 10 दिवस अधिकचे दिले. फक्त सरकार भेटीगाठी घेऊन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. सरकारला फक्त वेळ घालवायचा आहे. ते आमचेच लोक आमच्याविरोधात उभे करत आहेत. आमच्याच लोकांना भडकावण्याचं काम सुरू आहे. असं करून सरकारला वाटत असेल की हे आंदोलन मोडीत निघेल आणि सरकार झोपेचं सोंग करत असेल, यांच्या कानात मळ गेला असेल. त्यामुळे यांचं सोंग मोडण्यासाठी आणि या सरकारला जागं करण्यासाठी हे शिट्ट्या वाजवून आंदोलन करत आहोत’, अशी प्रतिक्रिया अन्य एका मराठा आंदोलकानं व्यक्त केली.