विश्वविक्रमी मेस्सी… काल…आज आणि उद्याही

170

shraddha-bhalerao-01<< श्रद्धा भालेराव । मुंबई

बार्सिलोनाचा मेन स्ट्रायकर आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीने नुकतेच वयाच्या ३२व्या वर्षात पदार्पण केले आहे. २४ जून १९८७ रोजी अर्जेंटिनामधील रोजारियो शहरात मेस्सीचा जन्म झाला. मेस्सीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर त्याची गणना सध्याच्या स्टार फुटबॉलरमध्ये करण्यात येते. रशियात सुरू असलेला २१वा फिफा विश्वचषक मेस्सीच्या कारकीर्दीतील शेवटचा असण्याची शक्यता आहे. सर्व चाहत्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या असल्या तरिही त्याला अद्याप काही खास कामगिरी करण्यात यश आले नाही. बलाढ्य अर्जेंटिनाचे या विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु मेस्सी एवढ्यात हार मानणारा नाही आणि तो आपल्या दमदार खेळीने फिफा विश्वचषकात पुन्हा एकदा कमबॅक करेल असा विश्वास अनेक चाहत्यांना आहे. आपल्या चाहत्यांच्या अपेक्षांवर कितपत खरा उतरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मेस्सीने आजपर्यंत आपल्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली आहे. परंतु, मेस्सीने हे यश आपली प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि फुटबॉलप्रती असलेल्या प्रेमाच्या जोरावर कमावले आहे. लहानपणी एका भयंकर आजाराला मात देऊन हा पठ्ठ्या आज हजारो नाही तर लाखो, करोडो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

‘द मशीन ऑफ ८७’

messi-childhood

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासूनच रोजारियो शहराच्या ‘न्यूएल्स ओल्ड बॉयज क्लब’मधून मेस्सीने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. त्याचे वडीलच त्याचे फुटबॉलचे पहिले प्रशिक्षक होते, परंतु त्याचा खेळ सुधारण्यात सर्वात मोठा वाटा त्याच्या आजीचाच होता. मेस्सीचा सराव होण्यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची. ‘न्यूएल्स ओल्ड बॉयज क्लब’च्या यूथ टीमसाठी खेळत असताना त्याने जवळपास ५०० गोल केले होते. लहान वयातील या विक्रमाचा परिणाम असा झाला की, तो क्लबसाठी ज्या टीममध्ये खेळत होता. त्या टीमचे नावच त्याच्या जन्मवर्षावरून ठेवण्यात आले होते. त्याच्या टीमचे नाव बदलून ‘द मशीन ऑफ ८७’ असे ठेवण्यात आले होते.

फुटबॉलवर अविश्वसनीय नियंत्रण

messi-fotballer

लहानपणापासूनच मेस्सीने बॉलवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र अंगीकारले होते. तो सतत १५ ते २० मिनिटे न थांबता आपल्या दोन्ही पायांनी जगलिंग करू शकत होता. एवढ्या लहान मुलाला असे करताना पाहून लोक आश्चर्यचकित होत असत. हळूहळू मेस्सीच्या नावाची किर्ती संपूर्ण अर्जेंटिना शहरात पोहोचली. सारे त्याच्याकडे आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करणारा फुटबॉलर म्हणून पाहू लागले होते. परंतु, अशातच मेस्सीच्या आयुष्यात एक खडतर वळण आले. वयाच्या १०व्या वर्षी मेस्सीला समजले की, त्याला ‘ग्रोथ हार्मोन डिफिशिएंसी’ आहे. त्यामुळे मेस्सीला लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे होते नाहीतर त्याची शारिरीक वाढ खुंटली असती. यावर उपचार करणे फार खर्चिक होते. मेस्सीच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची असल्यामुळे या सर्व उपचारांचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी फार कठीण होते.

टीशू पेपरवर सही केले होते आयुष्यातील पहिले कॉन्ट्रॅक्ट

messis-first-contract-01

सध्याचा स्टार खेळाडू मेस्सीने आपले पहिले कॉन्ट्रॅक्ट टीशू पेपरवर सही कले होते. आजीच्या निधनांतर मेस्सी खूप खचून गेला होता. त्यात जडलेल्या आजारामुळे फुटबॉल खेळण्याचे त्याचे स्वप्न तूटण्याच्याच मार्गावर होते. अशातच त्याच्या वडिलांना समजले की, बार्सिलोना फुटबॉल क्लब काही प्रतिभावान खेळाडूंसाठी ‘टॅलेंट हंट प्रोग्राम’ सुरू करत आहे. त्यांनी अजिबात उशिर न करता बार्सिलोना फुटबॉल क्लबशी संपर्क केला. बार्सिलोनाच्या डायरेक्टर कार्लेस रेक्सेक हे मेस्सी आणि त्याच्या खेळाबाबत ऐकूण होते. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट सही करण्याआधी मेस्सीला एक अट घातली होती की, त्याला त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत स्पेनमध्ये येऊन रहावे लागेल. मेस्सीने त्यांची अट मान्य केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट सही करायला कागद मिळाला नाही. त्यावेळी त्यांनी बाजूला असलेल्या टीशू पेपरवरच कॉन्ट्रॅक्ट सही करून घेतले.

‘ए टू झेड’ रेकॉर्डचा डोंगर

messi-in-fifa

मेस्सीने कॉन्ट्रॅक्टवर सही करून बार्सिलोना क्लबमध्ये प्रवेश केला होता. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षापासून त्याने बार्सिलोना क्लबकडून फुटबॉल लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मेस्सीने आपल्या खेळाच्या जोरावर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविले. उंचीने कमी असलेल्या मेस्सीने आपल्या खेळाप्रति असलेल्या निष्ठेच्या जोरावर रेकॉर्डचा डोंगर उभा केला. मेस्सीने आपल्या आतापर्यंच्या कारकिर्दीमध्ये ३० ट्रॉफी जिंकल्या आहेत. मेस्सीला सर्वाधिक पाच वेळा जगातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलर म्हणून गौरवण्यात आले आहे. मेस्सीने आतापर्यंत एकूण ७२४ सामने खेळले असून त्यामध्ये ५८४ गोल डागले आहेत. तसेच त्याने चार वेळा चॅम्पियन लीगचा किताब जिंकला आहे. इतकेच नाही तर त्याला तीन वेळा युरोपने बेस्ट फुटबॉलर म्हणून घोषित केले आहे. अर्जेंटिनासाठी खेळताना त्याने २००८च्या ऑलिंम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.

मेस्सीचे जगच वेगळे – यर्गेन

argentina-messi-001

लियोनेल मेस्सी जेव्हा मैदानावर उतरल्यावर असे दिसते की जणू त्याची बॉलसोबत जुगलबंदीच सुरू आहे. सगळ्या डिफेंडर्सना चकवा देत त्याची गोल डागण्याची क्षमता उल्लेखनीय आहे. जेव्हा बॉल मेस्सीकडे जातो, तेव्हा तो फक्त त्याच्याच इशाऱ्यांवर नाचत असतो. लिव्हरपूलचे फुटबॉल मॅनेजर यर्गेन क्लॉप यांनी मेस्सीविषयी बोलताना सांगितले की, ‘मेस्सी विश्वातील सर्वश्रेष्ठ खेळाडू आहेत. नक्कीच्या या विश्वामध्ये आणखी कुठेतरी वेगळे जग असेल. कारण आपल्यातले कोणीच मेस्सीशी बरोबरी करू शकत नाही.’

अर्जेंटिनाचा माजी खेळाडू मॅराडोनाची कमतरता मेस्सीने भरून काढली. इतकेच नव्हे तर त्याने मॅराडोनाचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. मेस्सी आपल्या खेळाप्रती प्रामाणिक आहेच पण आपल्या खेळात आणखी सुधारणा करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. सामन्याआधी होणाऱ्या ट्रेनिंग सेशनला मेस्सी सर्वांच्या आधी मैदानावर हजर असतो. आपल्या कमी उंचीमुळे तो इतर खेळाडूंसारखे हेडर मारू शकत नाही परंतु मेस्सीने सर्व अडचणींवर मात करून आपली ओळख निर्माण केली आहे.

आजीला अभिवादन

barsilona-messi
मेस्सी एक स्टार खेळाडू आहेच परंतु तो सतत समाजसेवेसाठीही झटत असतो. तो ‘ऑटिज्म’सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मदतीसाठी काम करतो. मेस्सी गोल केल्यानंतर ज्यावेळी दोन्ही हात उंचावून आभाळाकडे अभिवादन करतो त्यावेळी तो आपल्या आजीला श्रद्धांजली अर्पण करत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या