BEST च्या भंगार गाड्यांमध्ये होणार फिरते शौचालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-2
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘बेस्ट’ने भंगारात काढलेल्या गाडय़ांमध्ये आता फिरते शौचालय उभारले जाणार आहे. ही सुविधा मुंबईतील महामार्ग, छोटे रस्ते, गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत शिवसेनेने मांडलेला ठराव आज बहुमताने पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला. या सुविधेमुळे नागरिक-प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

मुंबईत सध्या मोठय़ा प्रमाणावर मोनो-मेट्रो रेल्वे, पूल आणि रस्त्यांची बांधकामे-दुरुस्ती सुरू आहे. शिवाय वाढलेली गर्दी, फेरीवाले यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. मात्र पालिकेने फुटपाथवर बांधकाम करण्यास मनाई केल्यामुळे शौचालय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गासह अनेक रस्त्यांच्या बाजूला शौचालय नसल्याने नागरिक, प्रवासी, मधुमेही रुग्ण यांची मौठी गैरसोय होत आहे.

या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’च्या भंगार गाडय़ांमध्ये शौचालय सुरू करून ही सुविधा असलेली वाहने गर्दीच्या ठिकाणी आणि मागणीनुसार उभी करावी अशा मागणीची ठरावाची सूचना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी मांडली होती. याला आज पालिकेच्या महासभेत बहुमताने मंजुरी मिळाल्याचे महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले.

बेस्ट’च्या नावलौकिकाला धक्का लागणार नाही
‘बेस्ट’च्या भंगार गाड्यांमध्ये शौचालय सुरू केल्यास मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला धक्का बसेल असा आक्षेप घेत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या प्रस्तावाला विरोध केला, मात्र ‘बेस्ट’च्या भंगार गाड्यांमध्ये शौचालय उभारताना या वाहनांवर ‘बेस्ट’चा लोगो किंवा रंगही राहणार नसल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी सांगितले. या वाहनांचा ‘बेस्ट’शी काहीही संबंध राहणार नाही. उलट खराब झालेल्या गाड्यांचा नागरिकांच्या सोयीसाठी उपयोग होणार असल्याचेही चेंबूरकर यांनी सांगितले.

पोलीस व्हॅनच्या धर्तीवर वाहने
बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलिसांच्या जुन्या वाहनांचा वापर करून स्वच्छतागृहे बनवण्यात आली आहेत. याच धर्तीवर 15 वर्षांनी भंगारात काढल्या जाणाऱ्या बेस्टच्या गाड्यांचे रूपांतर शौचालयात करण्यात यावे असे पडवळ यांनी प्रस्तावात म्हटले आहे. त्यानुसार या गाड्यांमध्ये शौचालये निर्माण करण्यात येणार आहेत.