श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरोळ

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरूवारी कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. सलग सुट्टी असलेने भाविकांनी श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व दत्त देव संस्थानने कृष्णाकाठी लावलेल्या असंख्य दिव्याने मंदिर परिसर उजाळून निघाला. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज पौर्णिमा व सुट्टी असल्याने हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी व कार्तिक पौर्णिमा स्नानासाठी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात मंदिर परिसरात दत्त देव संस्थानने व भाविकांनी कृष्णा-पंचगंगा काठावर लावलेल्या असंख्य दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला.

पौर्णिमेनिमित्त येथील मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी साडेबारा वाजता श्रींचा चरणकमलावर महापूजा, तीन वाजता पवमान पंचसूक्त पठण, रात्रौ साडे आठ वाजता धूप, दिप, आरती व पालखी सोहळा होवून शेजारती, असे कार्यक्रम झाले. येथील दत्त देव संस्थान मार्फत कापडी मंडप, दर्शनरांग, मुखदर्शन, क्लोज सर्किट व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, तसेच मोफत महाप्रसादाची सोय केली होती. सुमारे दहा ते बारा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेचे अध्यक्ष विकास दिगंबर पुजारी व सचिव प्राचार्य गुंडो श्रीपाद पुजारी यांनी सांगितले.

काल रात्री पासूनच भाविक पायी, दुचाकी, चारचाकी वाहनाने श्रींच्या दर्शनासाठी येत होते. आज कार्तिक स्नान समाप्ती असलेने हजारो भाविकांनी व महिलांनी कृष्णा-पंचगंगा नदीच्या काठावर पर्वकाल स्नानाचा लाभ घेतला. सायंकाळी पाच नंतर मुख्य मंदिराच्या दक्षिणोत्तर घाटावरती भाविकानी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्य दिवे लावण्यास सुरवात केली.

भाविकांनी कृष्णा काठची काकडी, वांगी तसेच पेढे, बर्फी,मेवा-मिठाई खरेदीसाठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व भाविकांची वर्दळ चालू होती. ग्रामपंचायत व दत्त देव संस्थान मार्फत भाविक व यात्रेकरुंसाठी विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून देणेत आल्या होत्या.