
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाच कडाव, करोळे, खांडस, सुगवे यांसह ७० गावपाड्यांमधील ग्रामस्थांचा आज चांगलाच घामटा निघाला. पहाटे पाचच्या सुमारास कर्जतहून मुरबाडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने कशेळे परिसरात विजेच्या एका पोलला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पोलसह विजेच्या तारा तुटल्याने कशेळे पॉवर हाऊसमधील फिडर बंद पडला. त्यामुळे कर्जतमधील गावपाडे अंधारात बुडाले. तब्बल अकरा तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला.
आज पहाटे पाचच्या सुमारास लोखंडाचा कच्चा चुरा घेऊन कर्जतहून मुरबाडच्या दिशेने ट्रक जात होता. हा ट्रक कशेळे परिसरात येताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट विजेच्या खांबावर जाऊन आदळला. चालक बचावला पण खांब तुटून खाली कोसळला, विजेच्या ताराही तुटल्या. याच खांबावरून कशेळे पॉवर हाऊसला विद्युत पुरवठा करण्यात येतो. मात्र अपघातामुळे हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे कशेळे फिडरवर अवलंबून असलेल्या ७० हून अधिक गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे रहिवाशांची झोपच उडाली.
अनेकांचा रोजगार हिरावला
उष्णतेच्या तीव्रतेमुळे कर्जतवासीय आधीच हैराण झाले आहेत. त्यातच पहाटे पाच ते दुपारी चारपर्यंत वीज नसल्याने असंख्य कामे खोळंबली. व्यावसायिक तसेच छोट्या कारखानदारांचेही नुकसान झाले. पाणीपुरवठा, दुकान, बिल्डिंग व्यवसाय करणारे, दूध शितकरण केंद्रे यावर परिणाम झाला. त्यामुळे अनेकांचा दिवसभराचा रोजगार बुडाला. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दवाखान्यातील रुग्ण यांचेही हाल झाले.
1 या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून लोखंडाचा चुरा रस्त्यावर पडला होता. अपघातानंतर पोलिसांनी चालक मोहम्मद चौधरी याला ताब्यात घेतले आहे.
2 पहाटे पाच वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सकाळी तातडीने महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम आज दुपारी चार वाजेपर्यंत चालले.
3 ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान तुटलेला खांब, तारांची दुरुस्ती व वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांचाही घामटा निघाला.

























































