होळीच्या दिवशी अभिनेत्रीच्या गाडीवर दारुड्यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

देशभरात होळीचा सण साजरा होत असतानाच मालाड येथे दारुड्यांच्या एका टोळक्याने चाहत खन्ना या टीव्ही अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी हे टोळके गाडीची तोडफोड करत होते. त्यावेळी अनेकजण तिथे होते. पण कोणीही चाहतच्या मदतीला आले नाही. शेवटी चाहतने चपलेने टोळक्याला मारहाण करत पिटाळून लावले.

होळीच्या दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास चाहत काही कामानिमित्त कारमधून मालाड येथे जात होती. त्याचवेळी अचानक 10-15 दारुड्यांचे एक टोळके तिथे आले. त्यांनी कार अडवत .गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यास कार चालकाने विरोध करताच टोळक्याने त्याला कारमधून बाहेर खेचत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हे बघताच चाहत कारमधून उतरली व तिने टोळक्याकडे चालकाला सोडून देण्याची विनंती केली. पण दारुच्या नशेत असलेले टोळके चालकाला मारतच होते. यामुळे तिने तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडे मदत मागितली. पण कोणीही तिच्या मदतीला आले नाही. शेवटी तिने पायातल्या चपलेने टोळक्याला पिटाळून लावले.