
नवीन शासकीय नियमानुसार घरपट्टीच्या आकारणीत सवलत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा नगरपालिकेच्या दोन सफाई कामगारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. प्रदीप शंकरराव गायकवाड (वय 55) व विनायक विलास गोडबोले (वय 45) अशी त्यांची नावे आहेत.
सातारा नगरपालिकेची सध्या चतुर्थ वार्षिक पाहणी सुरू आहे. त्यामध्ये शहर व हद्दवाढ परिसरातील मिळकतींच्या पाहणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून मिळकतींच्या पाहणीनंतर भाडेकरू, व्यावसायिक वापर यानुसार घरपट्टी निश्चित केली जाते. संबंधित तक्रारदाराची सातारा शहरात मिळकत आहे. त्याची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनुसार शासकीय नियमानुसार होणाऱया घरपट्टीच्या आकारणीत सवलत देण्यासाठी दोघांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर याबाबत सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये नगरपालिकेच्या आवारात दोघांना पकडण्यात आले.
























































