
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र या चकमकीत चार स्थानिक नागरिक आणि दोन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही चकमक सुरू असताना स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक करून दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत केली.
शोपियान जिल्ह्यातील कुंडालन गावात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर जवानांनी मंगळवारी सकाळी या गावात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान गावातील एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. त्यानंतर जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीदरम्यान काही स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. तसेच काहींनी दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत केली, त्यावेळी जवानांच्या गोळीबारात चार जवान जखमी झाले. या चकमकीनंतर जवानांनी या गावात व आजुबाजुच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

























































