
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
पोलीस आयुक्तालयात नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टमधील विटा बाहेर काढत असताना तोल गेल्याने दोन मजूर खाली पडून गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली. लिफ्ट खाली आदळताच झालेल्या जोरदार आवाजाने अख्खे आयुक्तालय हादरले. जखमी झालेल्या दोघा मजुरांना उपचारासाठी तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले.
पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम साइटवर बिहारी मजूर काम करीत आहेत. एकूण आठ मजली असलेल्या या इमारतीतील प्रत्येक मजल्यावर सिमेंटचे ब्लॉक, वाळू व अन्य बांधकाम साहित्य नेण्यासाठी लिफ्टचा वापर करण्यात येतो. गुरुवारी ए-वन या इमारतीत मजूर शेख मुस्तकिम आलम आणि शेख परवेज आलम हे दोघे लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर सिमेंटचे ब्लॉक घेऊन जात असताना साडेपाच वाजेच्या सुमारास लिफ्टमधील सिमेंटचे ब्लॉक बाहेर काढत असताना अचानक तोल गेल्याने दोघे मजूर खाली पडले. यावेळी लिफ्ट कोसळण्याच्या जोरदार आवाजाने आयुक्तालय हादरून गेले.
लिफ्टमधील मुस्तकीम आणि परवेज आलम हे दोघे गंभीर जखमी झाले. लिफ्ट पडण्याच्या आवाजामुळे इतरत्र काम करणारे कामगार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला कॉल केला, मात्र अर्धा तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका न आल्याने मजुरांनी दोघा जखमींना उपचारासाठी रिक्षाने घाटीत दाखल केले. दोघांवर घाटीत उपचार सुरू असून, यातील शेख परवेज आलम याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
परवेज यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षापासून पोलीस आयुक्त कार्यालयासह कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे सुरू आहेत. आयुक्त कार्यालयाची इमारत तयार झाली असून पुढील महिन्यात नवीन इमारतीत कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या दुर्घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



























































