
दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन तरुण जागीच ठार, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी 20 एप्रिल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भोकरदन जालना मुख्य रस्त्यावरील गारखेडा पाटीजवळ घडली.
विशाल कैलास साबळे (20) रा.बरंजळा साबळे ता.भोकरदन व विशाल शिवाजी दळवी (21) रा. येवता ता.जाफ्राबाद असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत, तर वैष्णवी दगडुबा साबळे (11 रा.बरंजळा साबळे ता.भोकरदन) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील तरुण विशाल साबळे हा त्याची चुलत बहीण वैष्णवी हिच्यासोबत दुचाकीने काही कामानिमित्त गारखेडा देवी येथे जात असताना गारखेडा पाटीजवळ अचानक समोरून येणाऱ्या विशाल दळवी यांच्या दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैष्णवी साबळे ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलीला अधिक मार लागला असल्याने या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दोन्हीही तरुणांचे प्रेत शवविच्छेदनाकरिता भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. या घटनेने बरंजळा साबळे व येवता या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
























































