दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दाबून टाकण्यासाठी आटापिटा करणारे आणि या प्रकरणात हात झटकून पालकांना शाळेबाहेर काढणारे आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव चेतन आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही आरोपी करण्याचे आदेश कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी दिले. यानंतर कोतवाल, आपटे आणि आठवले हे तिघेही फरार झाले आहेत. दरम्यान, नराधम आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर पालकांसह नागरिकांचा जनप्रक्षोभ उसळला. देशभरातही संताप व्यक्त झाला. या प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजल्याने न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आरोपी अक्षय शिंदेलाही मोठय़ा कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायमूर्ती व्ही.ए. पत्रावळे यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
संस्थाचालकांवर बदलापूर पोलीस मेहेरबान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या माध्यमातून विद्या प्रसारक संस्थेची आदर्श शाळा चालविली जाते. अत्याचारानंतर पालकांनी शाळेकडे धाव घेतली. मात्र शाळेने हात झटकले. विद्यार्थिनींवर अत्याचार झाला असताना त्याची खबर तातडीने शाळेने पोलीस ठाण्याला द्यायला हवी होती. मात्र शाळेने पालकांनाच दमदाटी करून पिटाळून लावले. या संपूर्ण प्रकरणात दोषी असलेल्या शाळेचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. मात्र आज न्यायमूर्ती व्ही. ए. पत्रावळे यांनी आदर्श विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव चेतन आपटे व मुख्याध्यापक अर्चना आठवले यांनाही या प्रकरणात आरोपी बनवले.
पोलिसांनी कलम सहा वाढवले
ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी पोलिसांच्या तपासात आणि कलमांमध्ये त्रुटी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले असता न्यायमूर्ती व्ही.ए. पत्रावळे यांनी या गुह्यात कलम 6 वाढवले. त्यानुसार आरोपीला कमीत कमी 20 वर्षे शिक्षा किंवा आजन्म कारावास होऊ शकतो.