
मराठी माणसाची भक्कम वज्रमूठ म्हणजे शिवसेना… तमाम हिंदूंचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना… अन्याय-अत्याचारावरील वार म्हणजे शिवसेना आणि शिवसैनिकांचा प्राण म्हणजे शिवसेना… हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि ओजस्वी विचारांतून जन्मलेली शिवसेना यंदा 60 वर्षे पूर्ण करत आहे. शिवसेनेचा हा हिरकमहोत्सवी वर्धापन दिन 19 जून रोजी मुंबईत मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरे होत आहे. त्याच वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन हा सुवर्णयोग आहे. त्यामुळे यंदाच्या वर्धापन दिन सोहळ्याबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. देशातील अस्थिर राजकारण, सत्ताधाऱ्यांचा अनागोंदी कारभार आणि निवडणुकांमधील गैरप्रकारांबद्दल जनतेच्या मनात असंतोष आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉजिस्टिकच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून लॉजिस्टिक क्षेत्रात मराठी तरुणांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध करून देण्यासाठी ‘शिवसेना भवन’ येथे विशेष प्रशिक्षण वर्ग राबवण्यात आले होते. त्यातील पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्या विद्यार्थ्यांना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत.
शिवसेना सदस्य नोंदणी शुभारंभ
शिवसेनेच्या वतीने दर दोन वर्षांनी प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच सोहळ्यात होणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
वर्धापन दिन सोहळ्यांत सर्वांना खुला प्रवेश असेल. सभागृहातील आसन व्यवस्था ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर असेल. पहिल्या काही रांगा विशेष निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्व शिवसेना नेते, उपनेते, सचिव, उपसचिव, समन्वयक, संघटक, प्रवत्ते, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, विभागप्रमुख, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
विचारमंथन, प्रबोधन आणि मनोरंजन
शिवसेनेचा यंदाचा वर्धापन दिन हा राजकीय विचारमंथनाबरोबरच प्रबोधन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असणार आहे. ‘आमचा कांबळे’ आणि ‘दंगल’सारख्या धारदार कवितांनी महाराष्ट्रभरात पोहोचलेले प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या कवितांचा कार्यक्रम या सोहळ्यात रंगणार आहे. त्याचसोबत प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन मंदार भिडे यांची खुसखुशीत आणि राजकीय टोलेबाजी मनोरंजनाची मेजवाणी ठरणार आहे. सुप्रसिद्ध व्याख्याते व शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘भगवा’ या विशेष विषयावर धगधगते आणि विचारप्रवर्तक व्याख्यानही होणार आहे.




























































