
उत्कर्ष सेवा मंडळाच्या उंबरठा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 25 डिसेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे. प्राथमिक फेरीतून सात एकांकिका संस्था अंतिम फेरीत सहभागी झाल्या असून अंतिम फेरीत या एकांकिका संस्थांमध्ये मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
संस्थेच्यावतीने सलग 19 वर्षे राज्यस्तरीय उंबरठा एकांकिका स्पर्धा राबविण्यात येत आहेत. सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पार पडली. प्राथमिक फेरीत एकूण 40 संस्था सहभागी झाल्या होत्या, असे मंडळाचे अध्यक्ष अनंत माळकर, चिटणीस कृष्णा कदम, कलाविभागप्रमुख आदित्य कदम यांनी स्पष्ट केले.
एकदम कडक नाटय़ संस्था, भाईंदर – आखाडा, ज्ञानसाधना नाटय़परिवार – डोक्यात गेलंय, महर्षा दयानंद महाविद्यालय – बारम, नाटय़रसमय – हाऊ कॅन आय हेल्प यू…? नाटय़स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय – प्रवास, गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय – काहीतरी अडकलंय, कीर्ती महाविद्यालय – उकळी या संस्था – एकांकिका यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे.




























































