विषारी दारूमुळे एकाच कुटुंबातील 4 जणांसह 16 लोकांचा मृत्यू, फेब्रुवारीपासून 271 लोकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । बाराबंकी

उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील राणीगंज भागात विषारी दारूमुळे एकाच कुटुंबातील 4 सदस्यांसह 16 जणांचा मृत्यू झाला, तर 35 पेक्षा जास्त लोक गंभीर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी देशी दारूचा दुकान मालक दानवीर सिंह, सुनील जयस्वाल आणि मनीष विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुकान मालक सुनील जयस्वालसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यानंतर युपी सरकारने कडक कारवाई करत चार अधिकाऱ्यांसह 16 जणांना निलंबित केले आहे. यात 3 हेड कॉन्स्टेबर आणि 5 कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. मृतांप्रती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवेदना व्यक्त केली असून दोषींविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये मदत देण्याचीही घोषणा केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या मते जेवण झाल्यानंतर सर्वांनी दारू प्यायली होती. दारू पिताच सर्वांची दृष्टी अंधूक झाली. तसेच उलटी आणि चक्करचा त्रास होऊ लागला. पोलिसांनी दारू आणि जेवणाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच एकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल.

फेब्रुवारीत विषारी दारूमुळे 255 लोकांचा मृत्यू
याच वर्षी उत्तराखंड, आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूमुळे 255 लोकांचा मृत्यू झाला होता. यातील 55 लोकं ही उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील होती, तर मेरठमधील 18, कुशीनगरमधील 10 आणि उत्तराखंडच्या रुडकी येथील 32 लोकं होती. तर आसाममधील गोलाघाट येथईल 85 आणि जोरहाट येथील 58 लोकांचा समावेश होता. दारूमाफियाने दारूत उंदीर मारण्याचे औषध मिसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली होती.