प्रादेशिक पक्षांनो, भाजपला पराभूत करायचे असेल तर एकत्र या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील सत्ताधारी भाजपला पराभूत करायचे असेल तर देशातील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे. 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक सर्वांनी एकत्र येऊन लढवावी, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा केले आहे.

ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपचा पराभव करणे हे आमचे ध्येय आहे. जर आपण पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव करू शकलो तर राष्ट्रीय स्तरावरही आपण भाजपचा पराभव करू शकतो, असे सांगत भाजपविरोधात सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र येण्याच आवाहन केले.

आमच्याकडे आता दोन वर्षे आहेत. या काळात आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार आहे. 2024 सालच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 पैकी 42 जागा या तृणमूलच्या पारडय़ात पडतील यासाठी आपला पक्ष प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या सत्ताकाळात राजकारणाचे स्वरूप बदलले असून त्यास जोरदार प्रत्युत्तर देण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.

कॉँग्रेसमुळे भाजपचा विजय

जे भाजपच्या विरोधात आहेत त्यांनी एका व्यासपीठावर यावे, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण जर कोणी गर्किष्ठपणामुळे मागे बसू इच्छित असेल तर तो आम्हाला जबाबदार धरू शकत नाही. गरज पडली तर आम्ही भाजपविरुद्ध एकटेच लढू, असा टोला ममता बॅनर्जी यांनी कॉँग्रेसला लगावला. मेघालय आणि चंदिगडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपला विजय मिळवून दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

अखिलेशच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशमध्ये प्रचार

आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याची तयारी केली असून त्याची सुरुवात गोव्यापासून होत आहे. आपला पक्ष उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवत नाही. पण येत्या 8 फेब्रुवारी रोजी अखिलेश यादव यांच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी प्रचाराला जाणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

पुन्हा तृणमूलच्या अध्यक्षपदी निवड

ममता बॅनर्जींची पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. ममता बॅनर्जी यांनी 1998 साली काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्यांनी तृणमूलची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत त्याच पक्षाच्या अध्यक्षा आहेत. 2011 साली डाव्या पक्षांना मात देऊन त्यांनी पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत केली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 294 पैकी 214 जागा जिंकल्या आहेत.