
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील सुशिक्षित मतदार आणि शिक्षकांचा कौल उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सत्ताधारी भाजपची खऱया अर्थाने या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. नाशिक पदवीधर आणि कोकण शिक्षण मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याने सर्वांचे लक्ष 2 फेब्रुवारीला होणाऱया मतमोजणीकडे लागले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे लढविण्याचा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने घेतला आहे. त्यानुसार नाशिक पदवीधरमधून अपक्ष शुभांगी पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक रिंगणात आहेत. तर संभाजीनगर शिक्षकमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमधून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱया शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील. तर अमरावती पदवीधरमधून धीरज लिंगाडे, नागपूर शिक्षक मतदारसंघातून कॉँग्रेसच्या पाठींब्याने सुधाकर अडबाले निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीने आपली ताकदपणाला लावली आहे. यामुळे विधान परिषदेच्या पाचही मतदारसंघात भाजपपुढे आव्हान उभे राहिले आहे.
नागपूर, अमरावतीत फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला
नागपूर शिक्षक मतदारसंघातून भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे नागोराव गाणार पुन्हा नशिब अजमावत आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच मोठय़ा प्रमाणात विरोध आहे. अमरावतीतून भाजपचे माजी राज्यमंत्री रणजीत पाटील पुन्हा रिंगणात आहेत. मात्र, त्यांच्याविषयी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱयांत नाराजी आहे. नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला आहे. तर रणजीत पाटील हे फडणवीसांच्या गुडबुकमधील मधील आहेत. यामुळे एकप्रकारे या निवडणुकीत फडणवीसांची प्रतिष्ठापणला लागली आहे.
नाशिकमध्ये तांबे पिता-पुत्रांची कसोटी
नाशिक पदवीधरमधून शिवसेनेच्या पाठींब्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शुभांगी पाटील यांनी माजी आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून तांबे पिता-पुत्रांची कसोटी लागणार आहे.
अशी होणार प्रमुख लढत
नाशिक पदवीधर ः अपक्ष शुभांगी पाटील (शिवसेना) विरुद्ध सत्यजीत तांबे
अमरावती पदवीधर ः धीरज लिंगाडे (कॉँग्रेस) विरुद्ध डॉ. रणजीत पाटील (भाजप)
कोकण शिक्षक ः बाळाराम पाटील (शेकाप) विरुद्ध ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप)
संभाजीनगर शिक्षक ः विक्रम काळे (राष्ट्रवादी) विरुद्ध किरण पाटील (भाजप)
नागपूर शिक्षक ः सुधाकर अडबाले (कॉँग्रेस पुरस्कृत) विरुद्ध नागोराव गाणार (भाजप पुरस्कृत)

























































