उद्ध्वस्त होणारी २८४ कोवळी आयुष्ये त्यांनी वाचवली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

घरगुती भांडण तसेच अन्य कारणांमुळे उत्तर प्रदेश तसेच बिहारमधून अनेक लहान मुले व मुली कल्याण रेल्वे स्थानकात पळून येतात. वाट चुकल्याने काही मुलांचे आयुष्य बरबाद होण्याची भीती असते. पळून आलेल्या या मुलांच्या मदतीसाठी ऊर्वी विक्रम चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. गेल्या दीड वर्षात यूपी व बिहारमधून पळालेल्या २८४ मुलांची घरवापसी करण्यास या ट्रस्टला यश आले आहे. पळून आलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात २४ तास हेल्प डेस्क उभारण्यात आले आहे.

कल्याण हे जंक्शन रेल्वे स्थानक असून देशाच्या विविध भागांतून मेल, एक्सप्रेस गाडय़ा येत असतात. कुशीनगर, पाटणा, काशी एक्सप्रेस अशा अनेक लांब पल्ल्यांच्या गाडय़ा येथे येत असल्याने युपी, बिहारमधून लोंढेच्या लोंढे उतरतात. अनेकदा लहान मुले व मुली घरातील भांडणाला वैतागून कल्याणमध्ये पळून येतात. अशा मुलांचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ऊर्वी विक्रम चॅरिटेबल ट्रस्ट करीत आहे. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने ही ट्रस्ट स्थापन करण्यात आली असून महत्त्वाच्या स्थानकांवर कार्यकर्ते काम करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत सुमारे ३०० मुले रेल्वे स्थानकात फिरत असल्याचे ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. या मुलांची सखोल चौकशी करण्यात आली तसेच त्यांच्या आई-वडिलांचा पत्ता, मोबाईल नंबर शोधून काढून २८४ मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून काहींना उल्हासनगरच्या बालगृहात पाठवले असल्याची माहिती प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आशीष यादव यांनी दिली.

-बुटपॉलिशवाले, फेरीवाले, स्टॉलवरील कर्मचाऱयांचाही वॉच
कल्याण रेल्वे स्थानकात सकाळ व रात्री २४ तास प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मेल, एक्सप्रेस गाडय़ांनी आलेल्या प्रवाशांमध्ये संशयास्पदरित्या फिरणाऱया मुलांवर बुटपॉलिशवाले, फेरीवाले तसेच स्टॉलवरील कर्मचाऱयांचाही वॉच आहे. अशा मुलांची माहिती ताबडतोब हेल्प डेस्कला मिळताच ऊर्वी विक्रम चॅरिटेबल ट्रस्टचे कर्मचारी आपले ‘ऑपरेशन’ सुरू करतात. प्रवाशांनीदेखील अशा मुलांची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

-१०९८ वर फोन करा
पळून आलेल्या मुलांची माहिती १०९८ या हेल्पलाइनवर द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर २४ तास हेल्प डेस्क उभारण्यात आला आहे.