Uttar Pradesh Election Voting – पश्चिम उत्तर प्रदेश कुणाचा पत्ता कापणार? विधानसभा निवडणुकीवर हिजाब वादाचे सावट

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची गुरुवारी पश्चिम उत्तर प्रदेशमधून सुरुवात होत आहे. हा मुस्लिमबहुल भाग असल्यामुळे या टप्प्यात मुस्लिम मतदार ‘किंगमेकर’ ठरणार असून मतदानावर कर्नाटकच्या हिजाब वादाचे सावट आहे. अशा स्थितीत काँग्रेसला ‘मुस्लिम कार्ड’ पथ्यावर पडण्याची आशा आहे, तर दुसरीकडे योगी सरकारमधील काही मंत्र्यांची प्रतिष्ठा टांगणीला लागली आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशच्या 11 जिह्यांतील 58 विधानसभा जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या भागात मुख्यत्वे मुस्लिम मतदारांच्या विभागणीवर राजकीय पक्षांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. सपा-आरएलडी आघाडीच्या आशा मुस्लिम-जाट युतीवर विसंबून आहेत, तर बसपासुद्धा दलित-मुस्लिम मतांच्या जोरावर विजयाचे स्वप्न पाहत आहे. याचवेळी काही जागांवर मुस्लिम नेत्यांमध्ये होणाऱया आमने सामने लढतीवर भाजपला विजयाची धूसर आशा आहे. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी जवळपास 50 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या मुस्लिम मतदारांपुढे भाजपचा टिकाव लागण्याची शक्यता कमी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

काँग्रेसचा तिसरा जाहीरनामा

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी बुधवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पक्षाचा तिसरा जाहीरनामा जारी केला. यात सत्तेत आल्यानंतर दहा दिवसांत शेतकऱयांचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल, 20 लाख सरकारी नोकऱया दिल्या जातील, 40 टक्के महिलांना रोजगार दिला जाईल आदी घोषणा केल्या आहेत.