
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांपैकी तानसा, मोडकसागर, विहार आणि तुळशी हे चार तलाव 7 ते 23 जुलैदरम्यान भरून वाहू लागले होते. त्यामध्ये आता मध्य वैतरणा तलावदेखील भरून वाहू लागला आहे. तर भातसा तलाव 99.46 टक्के (14,15,077 दशलक्ष लिटर) भरला असल्याने पावसाच्या एका जोरदार सरीने तो कोणत्याही क्षणी भरून वाहू लागणार आहे. आता फक्त अप्पर वैतरणा तलाव भरणे बाकी आहे. सध्या या तलावात 95.75 टक्के पाणीसाठा जमा आहे.
23 जुलै 2026 रोजी मध्यरात्री 2.07 वाजता मोडकसागर हा चौथा तलाव भरल्यानंतर जवळजवळ दोन महिने उलटले तरी उर्वरित अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या तीनपैकी एकही तलाव भरलेला नव्हता. मात्र 14 सप्टेंबर रोजी विघ्नहर्ता श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतर तलाव क्षेत्रात अधूनमधून चांगला पाऊस पडला आणि 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मध्य वैतरणा तलाव 100 टक्के भरला आहे. तर भातसा तलाव देखील भरण्याच्या मार्गावर आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईला दररोज 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पावसाळा संपल्यावर म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी सात तलावांत मिळून एकूण 14,47,363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची आवश्यकता भासते.
21 सप्टेंबर 2026चा पाणीसाठा
तलाव पाणीसाठा द. लि. टक्केवारी
अप्पर वैतरणा 2,17,404 95.75
मोडकसागर 1,12,006 86.88
तानसा 1,43,063 98.61
मध्य वैतरणा 1,93,641 100.00
भातसा 7,13,196 99.46
विहार 27,698 100.00
तुळशी 7,969 99.05
एकूण 13,34,979 (97.77क)
मुंबईची गरज किती…
मुंबईला दररोज सात तलावांमधून सध्या 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीसाठा 600 दशलक्ष लिटरने कमी आहे. त्यासाठी उपलब्ध पाणीपुरवठ्यामधून 32 टक्के पाणीचोरी आणि गळती यापोटी वाया जाते. ‘अल निनो’ या वादळाचा आणि अनियमित पावसाचा परिणाम पाहता राज्य शासनाने हवामान खात्याच्या सूचनेनुसार कमी पावसाचा आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तलावात जमा होणाऱया पाणीसाठय़ाचे पुढील 17 सप्टेंबर 2027 पर्यंत पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देश अगोदरच दिले आहेत.

























































