
वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्राr आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी अचानक झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली. यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मूळचे उत्तर प्रदेशच्या आजमगडचे असलेले कमलेश राय हे रविवारी सकाळी मुंबईला येण्यासाठी निघाले होते. त्यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल होते. विमानतळावर प्रवेश करताना नियमानुसार त्यांचे पिस्तूल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. ते हाताळताना त्यातून गोळीबार झाला. यात एका महिलेसह एक पुरुष कर्मचारी जखमी झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबारामुळे विमानतळावर काही वेळ प्रचंड घबराट उडाली. राय यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
राय यांनी ट्रिगर दाबला; जखमी कर्मचाऱ्याचा जबाब
जखमी रोहित राज याने धक्कादायक जबाब दिला. ‘राय यांची पिस्तूल आधीपासूनच लोड होते. शिवाय, त्यासोबत 21 जिवंत काडतुसे होती. आम्ही एक्स-रे काउंटरवर तपासणी करत असताना राय यांनी अचानक ट्रिगर दाबला. माझ्या सहकारी सुमन कुमारी समोरच उभ्या असल्याने गोळी त्यांच्या पायाला लागली. तर, छर्रे माझ्या पायाला लागले. अर्थात, ट्रिगर त्यांनी ठरवून दाबला की चुकून दाबला गेला हे खात्रीने सांगता येणार नाही, असे रोहित म्हणाला.
























































