
आशालता वाबगावकर यांचा जन्म मुंबईचा. मुंबईत त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’ ही त्यांची शाळा. कला शाखेतून पदवी आणि ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी’ महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एमए’ केले. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली. ’दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने राज्य नाटय़स्पर्धेत सादर केलेल्या ’संगीत संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. ’मत्स्यगंधा’ हे नाटक त्यांच्या अभिनय कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’, ’तव भास अंतरा झाला मन रमता मोहना’ ही नाटय़पदे गाजली. वसंत कानेटकर लिखित आणि मास्टर दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे होते. सत्यवती अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा 18 ते 70 वर्षे वयोगटातील विविध छटा आशालता यांना सादर करायच्या होत्या. ते एक आव्हानच होते. ते त्यांनी यशस्वीपणे पेलले.
‘मत्स्यगंधा’ च्या यशानंतर नंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्प म्हातारे अर्प’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱयाची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱयावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱयाला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ चांदणे शिंपीत जाती असे कित्येक मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत.
प्रख्यात सिनेदिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्यांच्या अभिनयावर खुश होऊन ’अपने पराये’ या सिनेमात आशालता यांना भूमिका दिली. ’अपने पराये’ नंतर आशालता यांचा हिंदीतील प्रवास सुरू झाला. अंपुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, शराबी, पुली, निकाह, सदमा, चलते चलते, जंजीर, आज की आवाज, वो सात दिन, पसंद अपनी अपनी, मंगल पांडे, ये तो कमाल हो गया, तेरी मांग सितारोंसे भर दू, मरते दम तक , घायल, शौकिन आदी अनेक हिंदी सिनेमांत त्यांनी काम केले आहे. तीन काsंकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील महाश्वेता, पाषाणपती तसेच जावई विकत घेणे, पुलवधु या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका होत. अंपुश चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले आणि पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांनी गायलेले ’इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणेही लोकप्रिय आहे. आशालता यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्नविनाशक मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे.
सातारा येथे अंत्यसंस्कार
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या काम करत होत्या. साताऱयात या मालिकेचे शूटींग सुरू होते. या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी एका गाण्याच्या शूटिंगसाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप आला होता. त्यानंतर सेटवर कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती आहे. मालिकेतील 27 कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांची प्रपृती गंभीर असल्याने त्यांना पाच दिवसांपासून सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु अर्तिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही. सोमवारी त्यांची प्रपृती अधिकच खालावली. अखेर कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. पहाटे 5 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट, नाटय़सृष्टी शोकसागरात बुडाली आहे. दरम्यान सातारा येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रेमळ आई गमावली!
खूपच दुर्दैवी घटना. या धक्क्यातून अजूनही मी सावरली नाहीये. गेले 4-5 दिवस अहोरात्र मी त्यांच्यासोबत रुग्णालयातच होते. आमच्या प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शूटींगसाठी गेल्या महिनाभरापासून त्या साताऱयात आनंदाने शूटिंग करत होत्या. मालिकेतील कालच्याच भागात त्यांची एन्ट्री दाखवली होती. पुठेतरी त्यांच्या आनंदाला नजर लागली अन् त्या आपल्याला सोडून कायमच्या गेल्या. त्या नेहमी स्वतःची खूप काळजी घ्यायच्या. या वयातही आजारपणाची एकही गोळी त्यांना नव्हती. इतकी काळजी घेऊन देखील कोरोनाच्या महामारीने त्यांचा घात केला. त्यांची एक्झिट मनाला कायमचा चटका लावून गेली आहे. आज मी माझ्या प्रेमळ आईला मुकलेय. – अलका कुबल,अभिनेत्री-निर्माती
आज फार हतबल झालेय. कोरोनाने एका अत्यंत सुंदर जीवाचा बळी घेतला. आशालता अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच बाळा म्हणत आशीर्वाद देणाऱया आशालता ताईच्या आत्म्यास शांती लाभो. – रेणुका शहाणे, अभिनेत्री
प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची ’माँ’, आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. – सुबोध भावे, अभिनेता

























































