
सामना ऑनलाईन, नागपूर
सर्वाधिक 41 वेळा रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबई क्रिकेट संघाचा खेळ खल्लास झाला. गतविजेत्या विदर्भाने मंगळवारी एलिट अ गटातील लढतीत मुंबईचा एक डाव व 145 धावांनी धुव्वा उडवला आणि दिग्गज संघाचे यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आणले. विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईची रणजी क्रिकेट स्पर्धेतील कामगिरी दर्जाहीन ठरलीय.
मुंबईने 6 बाद 169 या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली. पण अक्षय वाखरे ऍण्ड कंपनीच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव गडगडला. त्यांना पहिल्या डावात 252 धावाच करता आल्या. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या ध्रुमील मटकर याने फलंदाजीतही ठसा उमटवला. त्याने एक षटकार व सात चौकारांसह नाबाद 62 धावांची खेळी साकारली, पण इतर फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. ऑफस्पिनर अक्षय वाखरे याने 85 धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
एकाही लढतीत विजय मिळवता आला नाही:-
मुंबईच्या संघाला यंदाच्या रणजी मोसमात एकाही लढतीत विजय संपादन करता आला नाही. मुंबईने सात सामन्यांमधून फक्त 11 गुणांची कमाई केलीय. यापैकी पाच सामने अनिर्णीत राहिले असून दोन सामन्यांमध्ये त्यांना लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय.
तिसरा विजय:-
गतविजेत्या विदर्भाने यंदाच्या मोसमातही कात टाकलीय. त्यांनी सात सामन्यांमधून तीनमध्ये दमदार विजय मिळवलाय. ‘अ’ गटातून त्यांनी 28 गुणांची कमाई करीत टॉपचे स्थान मिळवले आहे. त्यांचे पुढल्या फेरीतील स्थान जवळपास निश्चितच आहे.
फॉलोऑननंतरही डाव गडगडला:-
विदर्भाने मुंबईवर फॉलोऑन लादला. मुंबईच्या फलंदाजांना दुसऱया डावातही आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांचा डाव 34.4 षटकांत 114 धावांमध्येच गडगडला. पुन्हा एकदा ध्रुमील मटकरने सर्वाधिक 36 धावा केल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटेने 48 धावा देत 6 फलंदाजांना जाळय़ात अडकवले. अक्षय वाखरे व अक्षय कर्णेवार यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. पहिल्या डावात धडाकेबाज शतक करणाऱया वासीम जाफरची यावेळी ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.




























































