गोवळपाठोपाठ शिवणे ग्रामस्थांचा विरोध, रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे ड्रोन भिरभिरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीच्या कामादरम्यान काही दिवसांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या ड्रोन सर्वेक्षणाला गुरुवारी गोवळपाठोपाठ शिवणे ग्रामस्थांनीही कडाडून विरोध केला. त्यासाठी शिवणेवासीयांनी सुमारे चोवीस तास माळरानावर ठिय्या मांडला होता. रिफायनरीमुळे कोकणच्या सौंदर्यात बाधा येणार आहे. तसेच या भागातील जैवविविधताही धोक्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पाला तीव्र विरोध होत असून आज येथे आलेल्या सर्वेक्षण पथकाचे ड्रोनही ग्रामस्थांनी भिरभिरून लावले.

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पातील उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाने केंद्र शासनाला आश्वासित केले आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहारही राज्य शासनाने केंद्र शासनाला केला आहे. या परिसरामध्ये ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाला दोन दिवसांपूर्वी गोवळ येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेत विरोध केला होता. त्यानंतर शिवणे येथे सर्वेक्षण सुरू झाले. त्यालाही तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत रोखून धरले. रिफायनरी आणि केमिकल प्रकल्पाला आमचा विरोध असून पर्यावरणपूरक प्रकल्पाला आमचा पाठिंबा असल्याची भूमिका आम्ही ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे मांडली. यावेळी त्यांनी चर्चा केल्यानंतर यापुढे ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासनाकडून कोणतेही काम केले जाणार नसल्याचे आश्वासित केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष बोळे यांनी दिली. गुरुवारी राजापूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रशासन कोणतेही काम करणार नसल्याचे आश्वासित केले. यावेळी मोठय़ा संख्येने आलेल्या ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत असल्याचे घोषित केले. मात्र यावेळी कोणत्याही प्रकारचे काम येथे होऊ देणार नाही, असा पवित्रा कायम ठेवला.