
सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी
संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले. दुष्काळाच्या झळा राज्यात जाणवत आहेत. पिण्याच्या पाणीची समस्या आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी औराद शहाजानी येथील ग्रामस्थांनी अनोखा उपक्रम राबवला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्राम पंचायत कार्यालयात ध्वजारोहण व ग्रामसभा आयोजित केली जाते. ग्रामस्थ 11.30 वाजता त्यांच्या अडचणी ग्रामसभेत मांडण्यासाठी आले. मात्र, सकाळी 10 वाजता ग्रामसभा झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी ग्रामसेवकांच्या दालनात घुसून ग्रामपंचायत सदस्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे पाढे ग्रामसेवकांसमोर वाचले. आमच्या समस्या कोण सोडवणार व आम्हाला न्याय कोण देणार, आम्हाला पिण्यासाठी व वापरायला पाणी मिळत नाही. आम्ही रोजगार करायचा का दिवसभर भटकत फिरून पाणी आणायचे, दिवसभर रोजगार करुन पाणी खरेदी घेण्यामध्ये पैसे खर्च करायचे, आमच्या गल्लीतल्या तुंबलेल्या नाल्या खुल्या करण्यात आलेल्या नाहीत, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, वेळेवर लाईट मिळत नाही, महावितरण मनमानी कारभार करून कधीही लाईट बंद करतो, दुरुस्तीसाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात येते, नवीन विजकनेक्शन मागण्यासाठी प्रत्येकी सातशे एक हजार रुपये 25 लोकांकडून घेतले तरी अद्याप मीटर देण्यात आलेले नाहीत, वीजचोरीची जोडणी काढा नाहीतर गुन्हे दाखल करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या मांडल्या. मागण्यांचे लेखी निवेदन ग्रामसेवक व महावितरणला देण्यात आले. आमच्या मागण्या मागणी पूर्ण करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.
























































