विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे या निवडणुकीतही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. लोकसभेतील पराभवामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मिंधे गट व अजित पवार गटातील अस्वस्थ आमदार बाहेर पडण्याची चर्चा आहे. या निवडणुकीतील गुप्त मतदानामुळे महायुतीच्या नेत्यांना क्रॉस व्होटिंगची चिंता आता सतावत आहे.
विधान परिषदेतील भाजपचे चार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, शिंदे गटाचा एक, काँग्रेसचे दोन तर अजित पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक अशा एकूण 11 आमदारांची मुदत येत्या 27 जुलै 2024 रोजी संपत आहेत. विधानसभेच्या ऐन पावसाळी अधिवेशनात विधान परिषद निवडणूक होत असल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजप आणि छोटय़ा मित्र पक्षाचे मिळून पाच, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचा मिळून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने सहावा उमेदवार दिला किंवा अपक्षाला पुरस्कृत केले तर विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे.
मुदत संपणारे आमदार
विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), डॉ. वजाहत मिर्जा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), डॉ. मनीषा कायंदे (शिंदे गट), अॅड. अनिल परब (शिवसेना), बाबाजानी दुर्राणी (अजित पवार गट), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष), जयंत पाटील (शेकाप)
विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित
आमदारांचा राजीनामा, आमदारांचे निधन आणि अपात्रतेची कारवाई यामुळे विद्यमान विधानसभेतील संख्याबळ 288वरून 274वर आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.