मुंबई पोलिसांनाच मराठीचे वावडे, एफआयआर लिहिला इंग्रजीत; हायकोर्टाने मागितला प्रतिज्ञापत्रावर खुलासा

महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर मराठीतूनच लिहिणे अपेक्षित आहे. तरीही वडाळा पोलिसांनी एक एफआयआर चक्क इंग्रजीतून लिहिला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने एफआयआर इंग्रजीतून का लिहिला याचा सविस्तर खुलासा प्रतिज्ञापत्रावर करण्याचे आदेश वडाळा पोलिसांना दिले आहेत.

याचिकाकर्ती  साधना ओमप्रकाश यादव यांनी परिमंडळ-4 चे डीसीपी डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीचा एफआयआर नोंदवून घेणाऱया पोलिसाने डीसीपी डॉ. प्रवीण मुंढे यांचे नाव काढून टाकण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यांचे नावदेखील एफआयआरमध्ये ठेवले. धक्कादायक म्हणजे ही तक्रार इंग्रजीतून नोंदवून घेण्यात आली. मुळात महाराष्ट्रात एफआयआरची नोंद ही मराठीतूच करून घ्यावी, असे गृह विभागाचे परिपत्रक आहे. तसेच महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. असे असताना वडाळा पोलिसांनी इंग्रजीतून एफआयआर का नोंदवला, असा सवाल न्यायालयाने केला.

महाराष्ट्र शासनाचे असे कोणते परिपत्रक आहे. असे कोणते आदेश आहेत किंवा नियम आहे, ज्याच्या अंतर्गत वडाळा पोलिसांनी हा एफआयआर इंग्रजीतून लिहिला याचा खुलासा प्रतिज्ञापत्रावर करावा, असे आदेश देत न्या. अजय गडकरी व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने ही सुनावणी 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत तहकूब केली.