वाळकेश्वरच्या बाबुलनाथ मंदिरात शिवसेनेने लावल्या मराठी पाटय़ा!

वाळकेश्वर येथील बाबुलनाथ मंदिरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठी भाषेत सर्व प्रकारची माहिती सांगणाऱ्या पाटय़ा लावल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आता सर्वप्रथम मराठी भाषेतील पाटय़ा दिसणार आहे.

बाबुलनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना वेगवेगळी माहिती देणारे अनेक फलक असून सूचना देणाऱ्या पाटय़ाही लावल्या आहेत. अतापर्यंत सदरची माहिती दर्शवणारे फलक केवळ गुजराती भाषेतच होते. त्याची शिवसेनेने गंभीर दखल घेत विभाग क्र. 12 च्या वतीने विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मंदिराला भेट देत गुजराती भाषेतील पाटय़ा काढून टाकल्या होत्या. तसेच मंदिरात सर्वात वरती मराठी भाषेतील पाटय़ा लावाव्यात असे बजावले होते. त्यानंतर आज शिवसेनेने सदरच्या पाटय़ा तयार करून त्या मंदिरात लावण्यास मंदिर प्रशासनाला भाग पाडले.

यावेळी विभागप्रमुख संतोष शिदे, समन्वयक शिवाजी रहाणे, सहसमन्वयक प्रकाश मिसाळ, गजानन भोसले, विनोद लोटलीकर, बाबू गोवेकर, आरती लोटणकर, शोभा जगताप, शाखाप्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष घरत, सिद्धेश माणगावकर, बाळा अहिरेकर, प्रभाकर पाष्टये, महिला शाखा संघटिका नयना देहरकर, योगिता पेंढारकर आदी उपस्थित होते.