
नाणार रिफायनरी होणारच, कोण अडवतेय ते पाहू, असे वक्तव्य आंगणेवाडीच्या जत्रेत झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत आपण केले. आपल्या या वक्तव्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाली हा फक्त योगायोग समजावा का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार व नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
आपल्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळय़ा खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा हे चिंताजनक आहे असे पत्रात नमूद केले आहे. कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीच्या विरोधात शशिकांत वारिशे सातत्याने आवाज उठवत होते, याबाबत लिखाण करीत होते. रिफायनरीचे समर्थक म्हणवून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते. रिफायनरीला कोकणातील जनतेचा विरोध आहे. शशिकांत वारिशेंसारखे पत्रकार रिफायनरीच्या विरोधात लोकांना जागृत करीत होते, हे सत्य नाकारता येत नाही. त्यांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी गोष्ट आहे, अशी खंत या पत्रात व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यावर रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांनी रिफायनरीच्या विरोधात सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिह्यातील पोलीस यंत्रणा व जिल्हाधिकाऱयांना वापरण्यात आले. शशिकांत वारिशे यांच्यावर पोलीस व इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता. रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागतील असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आंगणेवाडीतील आपल्या भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली असे आपणास वाटत नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
कोकणात पूर्वी झालेल्या हत्यांचा उल्लेख करताना, याआधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर अशा राजकीय हत्या झाल्या व राजकीय दबावामुळे मूळ आरोपी मोकाट राहिले. त्याच खुनी मालिकेत शशिकांत वारिशे यांचे हौतात्म्य जोडले आहे असे आपल्याकडे नमूद करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
समांतर न्यायालयीन चौकशी
कोकणातील इतर खुनांप्रमाणे हे प्रकरण दडपले जाईल अशी भीती असल्यानेच या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी व वारिशे यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावे अशी मागणी या पत्रात केली आहे.






























































