पडेगाव, चिकलठाण्यात पोलीस बंदोबस्तात कचरा टाकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरातील रस्त्यांवर पडलेला हजारो टन कचरा उचलण्याचे काम मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. मंगळवारी  पहाटेपासून सुमारे १०० ट्रक कचरा उचलून चिकलठाणा व पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रात टाकण्यात आला. मात्र, पडेगाव येथे नागरिकांनी कचऱ्याला विरोध करीत दगडफेक केली. त्यात एका ट्रकच्या काचा फुटून नुकसान झाले. त्यानंतर मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तात पडेगाव येथे कचरा टाकण्यात येत असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

पडेगावात वाहनांवर दगडफेक  
शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी मनपाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत.  सततच्या  पावसामुळे कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, माशांचा त्रास वाढल्यामुळे रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. साथरोग आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता कंट्रोल रूम तयार केल्यानंतर आता कचरा उचलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सोमवारी रात्रीपासून कचऱ्याच्या गाड्या भरून ठेवण्यात आल्या होत्या. पहाटे चार वाजेपासून पडेगाव व चिकलठाणा येथे या गाड्या पाठविण्यात आल्या. पडेगाव येथे सकाळी विरोध झाल्याने पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. मात्र पोलीस येताच विरोध करणाऱ्यांनी पलायन केले. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास अन्सारी कॉलनी येथील तरुणांनी कचऱ्याने भरलेल्या ट्रकवर दगडफेक केली. दगडफेकीत गाडीचे नुकसान झाले. तसेच एक मजूर जखमी झाला. या प्रकरणी भीमालाल गुंजाळे यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळपर्यंत दोनशे टन कचरा उचलण्यात आला होता.

खत निर्मितीसाठी मशीन बसविल्या
नागरिकांच्या विरोधानंतर पडेगाव व चिकलठाणा येथे मनपाने स्क्रीनिंग मशीन लावून या ठिकाणी खत निर्मिती करण्याची प्रक्रिया केली जात आहे. कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचे पाहून नागरिकांचा विरोध मावळला आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाणार आहे.

सिव्हील वर्कच्या निविदा आज उघडणार
महानगरपालिकेने पडेगाव आणि चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी सिव्हील वर्क करण्यासाठी निविदा काढण्यात आली असून या निविदा उद्या बुधवारी उघडण्यात येणार आहे. तसेच हर्सुलमध्ये ओपन टेक्नॉलॉजीसाठी इच्छूकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. तीन प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यावर लवकरच निर्णय  घेतला जाणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.