
सामना प्रतिनिधी । कळवण
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात शासन विविध सामाजिक संस्था, मंडळे आर्थिक श्रमदानातून प्रयत्न करीत आहेत. त्याच धर्तीवर कळवण तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱया 11 लपा प्रकल्प व चणकापूर धरणातील गाळ साचला असल्याने तो काढून साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांच्यामार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कळवण तालुक्यात लघु पाटबंधारेअंतर्गत गोबापूर, ओतूर, बोरदैवत, धार्डे दिगर, चिंचपाडा, भांडणे, खिराड, पिंप्री, धनोली, भेगू, जामलेवणी ही 11 धरणे (प्रकल्प) आहेत. यातील ओतूर धरणाला बांधल्यापासूनच गळती असल्याने हा प्रकल्प पावसाळा थांबताच कोरडाठाक पडतो. या धरणाच्या गळती थांबविण्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात होऊनही हा प्रकल्प पूर्ण होण्यास निधीअभावी रखडला आहे. तसेच इतरही प्रकल्पात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता कमालीची घटली आहे. तसेच कळवण तालुक्यासह सटाणा, देवळा, मालेगाव व जळगाव जिह्याला वरदान ठरलेल्या चणकापूर धरणातही गाळ साचला आहे.
जलसमस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना सध्या राज्यात सर्वत्र राबवली जात आहे. गावाच्या शिवारातील पाणी गावातच साठवणूक भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यास जलयुक्त शिवार या योजनेचा हातभार लागला आहे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तालुक्यातील 11 प्रकल्पासह चणकापूर धरणातून गाळ काढण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री यांच्यामार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गाळ काढल्यास सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार
तत्कालीन माजी मंत्री ए. टी. पवार यांनी हा गाळ काढण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले होते, मात्र शासनाकडून त्यावेळी कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने आजही गाळ काढण्याचे काम रखडले आहे. या 11 प्रकल्पांतील व चणकापूर धरणातील गाळ काढल्यास कसमादे परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्यासोबत बहुतांशी गावातील सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. 



























































