
सामना प्रतिनिधी, पुणे
संपूर्ण राज्याला बसणाऱ्या दुष्काळाच्या झळा आता पुण्यातही जाणवू लागल्या आहेत. पाणीटंचाईवर एक उपाय म्हणून पुण्यातील हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलिअर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे तिथे अर्धा ग्लास पाणी उणे असे म्हणायची वेळ आली आहे.
हॉटेलमध्ये येणाऱया प्रत्येक ग्राहकाला पूर्ण ग्लास भरून पाणी देण्याऐवजी अर्धा ग्लास पाणी द्यायचे. ग्राहकाने पुन्हा पाणी मागितले तरच त्याला पाणी द्यायचे किंवा पाण्यासाठी छोटय़ा आकाराच्या ग्लासचा वापर करायचा, असे अवाहन असोसिएशनने हॉटेल व्यावसायिकांना केले आहे. अर्धा ग्लास पाण्याबरोबरच हॉटेल व्यावसायिकांनी नाष्टय़ासाठी केळीचे पान किंवा डिस्पोजल प्लेट, चमचे वापरण्यास सुरुवात केली आहे.


























































