
पश्चिम बंगालमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाशी बंडखोरी केल्याने एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने आपल्या पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.
दक्षिण दम दम नगरपालिकेसाठी (South Dum Dum Municipality) सध्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये टीएमची नेते सुरजीत रॉयचक्रवर्ती (Surajit Roychowdhury) यांची पत्नी रिता रॉयचक्रवर्ती-दास (Rita Roychowdhury Das) यांना वॉर्ड क्रमांक नऊमधून उमेदवारी देण्यात आली होती. महिलांसाठी हा वॉर्ड राखीव असल्याने रिता यांना उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांनी टीएमसीने आपली दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीमध्ये वॉर्ड क्रमांक नऊमधून रिता यांचा पत्ता कट करून तिथे पक्षाची 39 वर्षीय महिला कार्यकर्ता तुंपा दास घोष (Tumpa Das Ghosh) यांना उमेदवारी देण्यात आली, तर रिता यांना वॉर्ड क्रमांक दहामधून तिकीट देण्यात आले. हा भाग तृणमूल काँग्रेसचा गड समजला जात असला तरी उमेदवारीवरून येथे पती-पत्नीमध्ये रणकंद सुरू झाले आहे.
पहिल्या यादीप्रमाणे आपल्याला वॉर्ड क्रमांक 9 मधूनच तिकीट हवे यासाठी रिता अडून बसल्या आहेत. पक्षाने तिकीट न दिल्यास याच वॉर्डमधून आपण अपक्ष लढू असे रिता यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे टीएमची नेत्यापुढे पक्षनिष्ठ पाळावी की पत्नीला साथ द्यावी असा मोठा पेचप्रसंग उभा राहिला. अखेर बंडखोरी करणाऱ्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने थेट घटस्फोटाचीच नोटीस तिला पाठवली. यानंतर रिता या बांधबनगरमधील आपले घस सोडून नागरबाजारमध्ये असणाऱ्या माहेरी निघून गेली आहे.
याबाबत सुरजीत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बंडखोरी करणाऱ्या पत्नीला आपण घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. मी पक्षासोबत दगाबाजी करू शकत नाही. दुसरीकडे रिता यांनीही आपल्याला घटस्फोटाची नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे या जोड्याच्या लग्नाला तीन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी राजकारणामुळे त्यांचे नाते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राजकारणामुळे पतीने पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर भाजप खासदाराने तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.




























































