
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने 2015/16 या वर्षापासून “सिंधुदुर्ग भूषण” असा पुरस्कार सुरु करण्याचे ठरवून तशी योजना आखण्यात आली आणि या पुरस्काराचा शुभारंभ म्हणून हा पहिला पुरस्कार कै. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्याचे निश्चित करुन तशी घोषणाही ख़ास पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली होती. ह्या सर्व घोषणा या घोषणाच राहिल्या आणि आता तब्बल दोन वर्ष पूर्ण होऊन गेली तरी हा सिंधुदुर्ग भूषण पुरस्कार मात्र अद्यापही वितरित केला नसून हा पुरस्कार जिल्हा परीषदेच्या विस्मरणात गेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्ग रम्य तसाच तो संस्कार संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याने सांस्कृतिक, कला, समाजकारण, राजकारण आदी सर्वच क्षेत्रांत नामांकित अशी माणसे दिलीत, त्यामुळे अशा सिंधुदुर्गच्या सुपुत्रांचा गौरव करुन त्यांचा आदर्श भावी पिढीसमोर रहावा यासाठी 2016 मध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी मोठा गवगवा करत “सिंधुदुर्ग भूषण” पुरस्कार देण्याचे निश्चित केले. हा पहिला पुरस्कार सिंधुदुर्गातील नसला तरीही सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात खूप मोठे काम असलेले कै. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा शुभारंभाचा पुरस्कार त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची परवानगी घेऊन जाहीर करण्यात आला.
हा पुरस्कार खास समारंभ घेऊन त्यात अप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन्मानपुर्वक देणार असल्याचेही ख़ास पत्रकार परिषदा घेऊन जाहीर करण्यात आले होते. याला आता दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊन गेला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन पदाधिकारीही बदलून गेले आणि हा पुरस्कार केवळ घोषणाच होऊन राहिला.
































































