
दिवाळीतच कोरोनाविरोधी लढ्याबाबत खूशखबर मिळाली आहे. कोरोनाविरोधी लढाईत हिंदुस्थानला मोठे यश आले आहे. कोरोनावरील हिंदुस्थानात बनवण्यात आलेल्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) मंजुरी दिली आहे. अनेक महिन्यांपासून कोवॅक्सिनच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू होते. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी कोवॅक्सिन ही लस विकसित केली आहे. कोवॅक्सिनच्या मंजुरीसाठी गेल्या काही महिन्यांपासून भारत बायोटेक कंपनीचे प्रयत्न सुरू होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वपारला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिंदुस्थानात कोरोनाविरोधी लसीकरणात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा सर्वाधिक वापर करण्यात येत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनला मंजुरी मिळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या परवानगीची गरज होती. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही कोवॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला बळ मिळाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनला मंजुरी दिल्याने ही लस घेतलेल्यांनाही परदेशात जाता येणार आहे. तसेच त्यांना क्वारंटाईन होण्याचीही गरज भासणार नाही.



























































