कंडोमचा सर्वाधिक वापर मुसलमान करतात, असदुद्दीन ओवेसी यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कंडोमचा सर्वाधिक वापर मुसलमान करतात. दोन मुलांच्या जन्मामध्ये अंतर ठेवण्यासाठी मुसलमान कंडोमचा सर्वाधिक वापर करतात, असा दावा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात धार्मिक आधारावर लोकसंख्येचा असमतोल करण्याचा प्रयत्न असल्याचे विधान केले होते. या विधानवर प्रतिक्रिया देताना अससुद्दीन ओवेसी यांनी हा दावा केला आहे.

एका सभेमध्ये बोलताना अससुद्दीन ओवेसी म्हणाले की, लोकसंख्या वाढीवर बोलताना आकडेवारी दाखवायला हवी. मात्र मोहन भागवत यावर बोलणार नाहीत. मुसलमानांची लोकसंख्या वाढत नाहीय. चिंता करू नका, उलट मुसलमानांची लोकसंख्या घटतेय. मुसलमानांचा प्रजनन दर घटतोय. दोन मुलांमध्ये सर्वाधिक अंतर मुसलमान ठेवतात आणि कंडोमचा सर्वाधिक वापरही मुसलमान करतात.

नवरात्रीमध्ये गरबामध्ये सहभागी झालेल्या मुसलमानांना मारहाण झाल्याच्या घटनांवरही असदुद्दीन ओवेसी यांनी भाष्य केले. मुसलमानांना लाठ्या-काठ्यांनी मारलं जातंय. ही लोकशाही आहे का? यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात का? हे कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला. तसेच रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांनाही आदर मिळतो, परंतु मुसलमानांना मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली.