
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माय-लेकीचा गळा दाबून खून केल्याची घटना जत तालुक्यातील कोणीकोनूर येथील बेळुंखेवस्तीवर रविवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
प्रियांका बिराप्पा बेळुंखे (वय 32) व मोहिनी बिराप्पा बेळुंखे (वय 14) अशी मृत माय-लेकीची नावे आहेत, तर बिरुदेव ऊर्फ बिराप्पा नाना बेळुंखे (वय 36) याला अटक करण्यात आली आहे. संतोष रामा चौगुले (रा. खैराव) यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
बिराप्पा बेळुंखे कुटुंबीय टोणेवाडी-सनमडी रस्त्यालगतच्या बेळुंखेवस्तीवर राहतात. बिराप्पा बेळुंखे यांचा विवाह 15 वर्षांपूर्वी खैराव येथील प्रियंका हिच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बिराप्पा पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता. याच कारणातून प्रियांका 6 एप्रिल रोजी खैराव येथील माहेरी आली होती. त्यावेळी नातेवाईकांनी तिची समजूत घालून तिला सासरी नांदायला पाठविले होती. दरम्यान, रविवारी चारित्र्याच्या संशयावरून बिराप्पाने पत्नी व मुलीचा दोरी व ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर एका छपरात मृतदेह ठेवण्यात आले होते. सुरुवातीला त्याने पत्नी व मुलगी हरविल्याचा कांगावा केला. नंतर शेजारच्या काही लोकांनी खून केल्याचा बनाव त्याने केला होता; परंतु नातेवाईकांनी दुहेरी खून केला असल्याची फिर्याद उमदी पोलिसांत दिली आहे. यावरून पती बिराप्पा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांनी घटनास्थळी भेट दिली. सोमवारी सकाळी प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनीही घटनास्थळी भेट दिली. माय-लेकीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता; परंतु प्रियंकाच्या सासू मंगल नाना बेळुंखे यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.




























































