यूटय़ूबवरचे व्हिडीओ पाहून एटीएममधून काढायचे पैसे 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूटय़ूबवरील व्हिडीओ पाहून एटीएम मशीनशी छेडछाड करून पैसे काढणाऱया दोघांना नागपाडा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. चंदन रजत आणि विकासकुमार पासवान अशी त्यांची नावे आहेत. मुंबईत लूटमार करून ते पुन्हा बिहार आणि पश्चिम बंगालला जाणार होते. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागपाडा जंक्शन येथे एका खासगी बॅंकेचे एटीएम आहे. शुक्रवारी रात्री एक जण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आला. मात्र पैसे निघत नसल्याने तो ग्राहक निघून गेला. तेव्हा एटीएमबाहेर रजत आणि चंदन हे दोघे बाहेर उभे दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बँकेने याची माहिती नागपाडा पोलिसांना दिली. बँकेच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर, पोलीस निरीक्षक रईस शेख, सहायक निरीक्षक सोमनाथ काळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

 त्या फुटेजवरून पोलिसांचे पथक नागपाडा येथील बाटा जंक्शन येथे गेले. पोलिसांनी एका एटीएमबाहेर फिल्डिंग लावून चंदन आणि विकासकुमारला ताब्यात घेतले. चंदन आणि विकास हे दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांनी एटीएममधील पैसे लुटायचे याबाबत यूटय़ूबवर व्हिडीओ पाहिले. तीन महिन्यांपूर्वी ते नालासोपारा येथे आले. तेथे त्यांनी भाडय़ाने घर घेतले. त्यानंतर ते एटीएममध्ये छेडछाड करून पैसे काढण्यासाठी मुंबईत आले. फसवणुकीतील काही रक्कम ते गावी पाठवत असायचे, तर काही पैशांतून ते मौजमजा करत असायचे.

एक दिवस अगोदर करायचे रेकी 

चंदन हा मुख्य सूत्रधार असून त्याने गुन्हा करण्यासाठी विकासला सोबत घेतले. ज्या एटीएमबाहेर फारशी वर्दळ आणि सुरक्षा रक्षक नसतो असे एटीएम ते निवडतात. चंदन हा एक दिवस अगोदर रेकी करतो. त्यानंतर दुसऱया दिवशी रात्री ते दोघे गुन्हा करण्यास येतात. विकास हा एटीएममध्ये जातो, तर चंदन हा एटीएमबाहेर उभा राहून रेकी करतो. विकास हा एटीएममधून पैसे येतात, तेथे चिकटपट्टी चिकटवतो. चिकटपट्टीमुळे व्यवहार होतात, पण पैसे ग्राहकांना मिळत नाहीत. पैसे न आल्याने ग्राहक बाहेर गेल्यावर ते आत जातात. चिकटपट्टीला अडकलेले पैसे घेऊन ते पळून जातात. त्या दोघांनी मुंबईत अशा प्रकारे अनेक गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.