महिलांनी घेतले तुळजाभवानी मातेचे चरणस्पर्श करुन दर्शन, तुळजापुरात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । तुळजापूर

मंदिर संस्थानचा विरोध असतानाही तुळजापूर शहरातील काही महिलांनी परंपरा मोडत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा चरणस्पर्श करत दर्शन घेतले. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात महिलांना चरणस्पर्श करण्याची परवानगी नव्हती.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र यावेळी आलेल्या महिला भाविकांना देवीचा चरणस्पर्श करण्याची परवानगी नव्हती. मात्र ही बाब महिला भाविकांना खटकणारी होती. शनिवारी सायंकाळी काही महिलांनी मंदिर संस्थानचा विरोध डावलत तुळजाभवानी मातेचा गाभाऱ्यात प्रवेश करीत चरणस्पर्श करून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. या वेळी अ‍ॅड. मंजुषा मगर, विभावरी गंगणे, वासंती जगताप आदी 20 ते 25 महिलांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले

तत्पर्वी अ‍ॅड. मंजूषा मगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मंदिर संस्थांच्या कुठल्या रेकॉर्ड किंवा नियमात महिलांनी चरणस्पर्श करु नये असे आहे का? याची विचारणा केली. त्यासंदर्भात कुठलाही नियम नाही हे लक्षात आल्यानंतर काल रात्री या महिला मंदिराच्या गर्भगृहात घुसल्या आणि देवीचा चरणस्पर्श केला.

इंदिरा गांधी यांनाही नाकारली होती परवानगी
आजवर एकाही स्त्रीने तुळजाभवानी मातेच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले नव्हते. अगदी माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं देवीच्या दर्शनासाठी आल्या असतानाही त्यांनाही देवीच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.