
मुंबई महापालिकेच्या आर-दक्षिण विभागात येणाऱ्या कांदिवलीतील पोईसर नदीकाठी पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले असल्याने नदीजवळच्या डहाणूकरवाडीत पाणी शिरणार नाही. त्यामुळे 3 ते 4 हजार झोपड्या आणि 12 सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संरक्षण भिंत नसल्यामुळे अतिवृष्टीत डहाणूकरवाडीत पाणी शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान होत होते. मात्र, मुंबई महापालिकेने संरक्षण भिंत बांधण्यातले सर्व अडथळे दूर करून संरक्षण भिंतीचे काम अवघ्या 15 दिवसांत पूर्ण केले.
कांदिवली (पश्चिम) येथील डहाणूकरवाडीतून वाहणार्या पोईसर नदीचा उगम राजीव गांधी राष्ट्रीय अभयारण्य क्षेत्रातील डोंगर रांगामध्ये होऊन ही नदी मालाड (पूर्व) स्थित क्रांतीनगर झोपडपट्टीत प्रवेश करते. अनेक प्रभागांतून वाहत येणाऱ्या या नदीचा प्रवाह कांदिवली (पश्चिम) मधील डहाणूकरवाडीत वसलेल्या वस्तीमुळे अ आणि ब या दोन प्रवाहात विभागला जातो. पुढे हे दोन्ही प्रवाह एकत्र येऊन मालाड (पश्चिम) मध्ये मार्वे खाडीला जाऊन मिळतात.
डहाणूकरवाडी वस्तीमुळे विभाजित होणाऱ्या दोन प्रवाहांपैकी ‘ब’ प्रवाह हा नदी पात्रातील झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे खूप अरुंद होतो तसेच त्या ठिकाणी बांधलेल्या पुलामुळे पावसाच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अतिवृष्टी झाली तर पुराचे पाणी थेट डहाणूकरवाडीत शिरते. शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांनी यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला सूचना केली होती.
रुंदीकरणात अडथळे
नदीपात्राचे रुंदीकरण करण्याचे काम 2018 सालापासून करण्याचे नियोजित होते. मात्र, या ठिकाणी वसलेल्या झोपडीधारकांच्या विविध मागण्यांमुळे पर्यायाने त्यातून निर्माण होणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे आर/दक्षिण विभागाला ‘ब’ प्रवाहपात्रातील झोपड्या हटवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पर्जन्यजल वाहिन्या विभागालादेखील या ठिकाणी नदीपात्राचे नियोजित रुंदीकरण करता आले नाही.
29 झोपड्यांवर तातडीने कारवाई
नदीतील पाण्याच्या प्रवाहाला बाधा आणणार्या किमान 29 झोपड्या आर/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त युद्धपातळीवर निष्कासित करण्याचे लेखी निर्देश 10 मे 2022 रोजी देण्यात आले. त्यानुसार उपायुक्त (परिमंडळ 7) भाग्यश्री कापसे आणि आर/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या 29 झोपड्यांचे निष्कासन करण्याची कार्यवाही 20 मे रोजी पूर्ण केली. स्थानिकांनीदेखील या निष्कासन कार्यवाहीला योग्य सहकार्य केले.
15 दिवसांत केले भिंतीचे बांधकाम पूर्ण
ही निष्कासन कार्यवाही पूर्ण होताच, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी 24 मे रोजी या ठिकाणी पुन्हा पाहणी केली आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रवाहातील अडथळा हटवून संरक्षक भिंतीचे कामदेखील युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार, निष्कासित झोपड्यांचा ढिगारा हटवण्याचे आणि या ठिकाणी वसलेल्या उर्वरित झोपड्यांना जोरदार पावसाच्या पाण्याचा फटका बसू नये म्हणून संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याची कार्यवाही पर्जन्य जलवाहिनी विभागाने सुरू करत 15 दिवसांत काम पूर्ण केले.
































































