देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येऊन काम करूया; शरद पवार यांचे विरोधी पक्षांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर सातत्याने होत असून लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले. सध्या एकत्र काम करणे जास्त महत्त्वाचे असून चेहरा नंतर ठरवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याबद्दल माध्यमांनी शरद पवार यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्याप्रमाणेच आणखी लोकांना ईडीची नोटीस आली आहे. आम्ही वाट बघतोय अजून कधी आणि केव्हा येईल. सत्तेचा गैरवापर हा सातत्याने केला जातो आहे हे याचे उत्तम उदाहरण असून आम्ही त्याविरोधात लढू.

शरद पवार विरोधकांचा चेहरा झाल्यास आनंदच

लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जर 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा चेहरा झाल्यास आपल्याला आनंदच वाटेल, असं नितीशकुमार म्हणाले.