
लखनौच्या आनंदी वातावरणात अफगाणींच्या चेहऱयावर विजयी हास्य फुलले. वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी नेदरलॅण्ड्सचा 111 चेंडू आणि 7 विकेट्स राखून पराभव केला. आजच्या विजयामुळे अफगाणिस्तानचे 8 गुण झाले असून त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. पण ते दोन्ही सामने स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या बलाढय़ संघांशी असल्यामुळे त्यांचा खडतर प्रवास पुढेही कायम असेल.
आज अफगाणींनी 2 बाद 92 वरून नेदरलॅण्ड्सवर चढवलेला हल्लाच त्यांना विजयाकडे घेऊन गेला. दक्षिण आफ्रिकेला हरवून सनसनाटी निर्माण करणारे डच आज अफगाणी गोलंदाजांच्या हल्ल्यात कोसळले. मुजीबूर रहमानने पहिल्याच षटकात वेस्ली बारेसीला पायचीत केले, पण त्यानंतर मॅक्स ओडाऊड आणि कॉलिन ऍकरमनने 70 धावांची भागी रचत संघाला सलामीच्या धक्क्यातून बाहेर काढले. पण ओडाऊड धावचीत झाला आणि डचच्या डावाला नजरच लागली. त्यांचे चार फलंदाज धावचीत झाले आणि 5 बाद 97 अशी दुर्दशा झाली. उर्वरित अर्ध्या संघाला मोहम्मद नबी आणि नूर अहमदने गुंडाळले. सायब्रॅण्ड एंजलब्रेश्टने 58 धावांची झुंजार खेळी करत संघाला दीडशेपार नेले.
सायब्रॅण्डच्या झुंजार खेळीमुळे नेदरलॅण्ड्सने 180 धावांचे लक्ष्य ठेवले असले तरी अफगाणने लढाईत आघाडी घेतली होती आणि अपयशी सुरुवातीनंतरही रहमत शाह (52) आणि कर्णधार हशमतुल्लाह आफ्रिदीने 74 धावांची भागी रचत संघाला सहज विजयासमीप नेले. मग त्याने ओमरझाईच्या बरोबर 32 व्या षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले.

























































