Cricket World Cup 2023 – तिकिटांचा काळाबाजार; कोलकात्यात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या हिंदुस्थानात वर्ल्ड कपच्या निमित्ताने तिकिटांचा काळाबाजार खुलेआम होत असताना कुणीही साधी तक्रार केली नाही. मात्र कोलकात्यात या काळाबाजाराविरोधात तक्रार करण्यात आली असून बंगाल क्रिकेट क्लब (कॅब) आणि बुकिंग ऍप मिळून तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची तक्रार तक्रारकर्त्याने कोलकाता पोलिसांकडे केली आहे.

तिकिटांच्या काळाबाजाराबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कॅब आणि ऑनलाईन तिकीट विक्री पोर्टलच्या अधिकाऱयांना नोटीस धाडून हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण कुणीही प्रतिनिधी आला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. परवा बुधवारीच याबाबत मैदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत कॅब अधिकारी आणि ऑनलाईन पोर्टल मिळून काळाबाजार करत असल्याचे आरोप केले आहेत.

तक्रारदारानुसार कॅब आणि पोर्टलने सामान्य क्रिकेटप्रेमींच्या नावाखाली मोठय़ा संख्येने तिकीट राखीव केल्या आहेत. हीच तिकिटे ते दोघे मिळून काढत असून ती काळाबाजारात पाठवत आहेत. तक्रारदाराच्या या आरोपांचे कॅबने खंडन केले आहे. आम्ही फक्त सामन्यांचे यजमान आहोत आणि तिकीट विक्रीशी आमचा काडीचाही संबंध नाही. तिकीट विक्रीची सर्व जबाबदारी बुकिंग ऍप आणि आयसीसीची असल्याचे सांगितले.

तिकीट विक्रीबाबत जनाक्रोश
हिंदुस्थानच्या सामन्यांना प्रचंड मागणी असूनही ऑनलाईनवर अल्प तिकिटे. तिकीट विक्री सुरू होताच लोकांना तासनतासप्रतीक्षा करायला लावून प्रचंड तिकीट विक्री होत असल्याचा भासाची निर्मिती. हिंदुस्थानच्या कोणत्याही सामन्याची सामान्य चाहत्यांना अत्यल्प तिकिटे. मात्र आसनक्षमतेच्या 10 ते 20 टक्के तिकिटे कॉम्प्लिमेंटरी म्हणून काळाबाजारात. इतक्या मोठय़ा संख्येने तिकिटे कॉम्प्लिमेंटरी म्हणून का वाटण्यात आली? आणि कॉम्प्लिमेंटरी तिकिटे काळाबाजारात उपलब्ध कशी झाली? या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. सामान्य चाहत्यांना तिकिटे मिळावीत म्हणून ऑनलाईनवर हजारो तिकिटे उपलब्ध केल्याचा संघटनांकडून आव. पण प्रत्यक्षात ऑनलाईनची तिकिटे ऍपच्या मार्गे काळाबाजारात. हे सर्व संघटनांच्या सहमतीने आणि परस्पर सामंजस्याने होऊच शकत नाही.