राजकोट… राजकोट… जयस्वाल, हिंदुस्थानचा कसोटीतील विक्रमी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जैसवालसमोर इंग्लंडचा बॅझबॉल फुटला,  हिंदुस्थानचा कसोटीतील विक्रमी विजय 
यशस्वी जैसवाल आणि रवींद्र जाडेजाच्या अद्भुत खेळासमोर इंग्लंडचा ‘बॅझबॉल’ फुसका आणि फुटका ठरला. हिंदुस्थानच्या 557 धावांच्या विक्रमी आव्हानासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 122 धावांत फुटला आणि हिंदुस्थानने कसोटी इतिहासातील सर्वोच्च 434 धावांच्या विक्रमी विजयाची नोंद केली. पहिल्या डावात शतक आणि सामन्यात 7 विकेट घेणारा रवींद्र जाडेजा ‘सामनावीर’ ठरला. या विजयामुळे हिंदुस्थानने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
शनिवारच्या 2 बाद 196 धावांवरून खेळ सुरू करणाऱया हिंदुस्थानला शुबमन गिलच्या शतकाची प्रतीक्षा होती, पण ती नव्वदीतच संपली. गिल बाद झाल्यावर शनिवारी  104 धावांवर जखमी निवृत्त झालेला यशस्वी जैसवॉलने आपल्या मुंबईच्याच पदार्पणवीर सरफराज खानबरोबर मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांना पह्डून काढत 26.2 षटकांत 172 धावांची घणाघाती भागी रचली. याच भागीमुळे हिंदुस्थाने दुसऱया डावातही चारशेचा टप्पा गाठला आणि त्यांच्यासमोर 557 धावांचे अवघड आव्हान ठेवले. विशाखापट्टणमलाही द्विशतक झळकावणाऱया यशस्वी जैसवालने राजकोटमध्येही द्विशतक साजरे करत सलग द्विशतकांचा पराक्रम रचला. हे आव्हान पाहूनच इंग्लंडची हवा निघाली होती आणि प्रत्यक्ष मैदानात उतरताच तर ते फुसके आणि फुटके ठरले. आपल्या ‘बॅझबॉल’ शैलीसाठी प्रसिद्ध असलेली इंंग्लिश फलंदाजी 122 धावांतच धारातीर्थी पडली. ना ते लढले ना संघर्ष केला. ते केवळ उताणे पडले. पहिल्या डावात शतक झळकावणाऱया रवींद्र जाडेजाने आपल्या फिरकीची कमाल दाखवत राजकोटमध्ये धमाल उडवली. त्याने 41 धावांत अर्धा संघ गारद करत इंग्लंडच्या डावाला पाचवा दिवसच गाठू दिला नाही. सामना चौथ्या दिवस संपण्यापूर्वीच संपला.
संघर्षाविनाच ‘बॅझबॉल’ फुटला 
कसोटी क्रिकेटची रंगत खऱया अर्थाने वाढवली ती इंग्लंडच्या बॅझबॉल वृत्तीने. हिंदुस्थानचे 557 धावांचे आव्हान अशक्यप्राय असले तरी इंग्लंड 130 षटकांच्या खेळात सामन्यात जोरदार खेळ करत धम्माल उडवेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण ‘बॅझबॉल’ने आज घोर निराशा केली. पहिल्या डावात 153 धावांची आक्रमक खेळी करत हिंदुस्थानी गोलंदाजी पह्डून काढणारा बेन डकेट धावचीत झाला आणि हिंदुस्थानने सुटकेचा निःश्वास सोडला.
डकेटनंतर इंग्लंडचा एकही फलंदाज ‘बॅझबॉल’चा साजेसा खेळ करू शकला नाही. ते केवळ विकेट फेकायला येत असल्याचेच चित्र दिसू लागले. जसप्रीत बुमराने झॅक काऊलीला बाद करून हिंदुस्थानला आणखी एक यश मिळवून दिले. मग आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या रवींद्र जाडेजाने ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टॉला बाद करून इंग्लंडची 4 बाद 28 अशी दुर्दशा केली आणि त्यानंतर संघाचे अर्धशतक पूर्ण होताच जो रुटला पायचीत करून इंग्लंडचा पराभव निश्चित केला. तेव्हा मैदानात बेन स्टोक्स उभा होता, पण त्यानेही तेथेच हार मानली होती. त्यामुळे पुढे केवळ हिंदुस्थानच्या विजयाची औपचारिकता उरली होती. 50 धावांवरच कुलदीपने स्टोक्सला बाद केले तर रेहान अहमदला जाडेजाने बाद करून इंग्लंडची 7 बाद  50 अशी केविलवाणी अवस्था केली.
7 बाद 50 नंतर बेन पह्क्स (16), टॉम हार्टली (16) आणि मार्क वूड (33) यांनी संघाचा दारुण पराभव टाळण्याचा प्रयत्न केला आणि संघाला 122 धावांपर्यंत नेले. या तिघांनी 15 षटके संघाचा पराभव लांबवताना 72 धावांची भर घातली.
नव्या टीम इंडियाचे राजकोट 
भले पहिल्या डावात रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाने खेळ केला असेल, पण दुसऱया डावात नव्या टीम इंडियाची फलंदाजी पाहायला मिळाली. कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर बाद झाला. पण पुढे यशस्वी जैसवाल, शुबमन गिल आणि सरफराज खानने जोरदार आणि दमदार खेळ करत हिंदुस्थानला चौथ्या डावात चक्क चारशेचा टप्पा गाठून दिला. शनिवारच्या 2 बाद 196 वरून पुढे खेळ सुरू करणाऱया गिल-यादव जोडीने 52 धावांची आणखी भर घातल्यामुळे इंग्लंडच्या पायाखालची जमीनच सरकली. नाइट वॉचमन कुलदीपने दीड तास खेळ करत 91 चेंडूंना सामोरे जात 27 धावांची खेळी करत स्वतःचे काwतुक करून घेतले.
कुलदीपनंतर गिलला आपल्या शतकाची वाट होती, पण त्याने संतुलन गमावले आणि तो धावबाद झाला. त्याची शतकी खेळी 9 धावांनी हुकली.
मुंबईकरांचा धमाका 
दुसऱया डावात रोहित खेळला नसला तरी यशस्वी जैसवाल आणि सरफराज खान या मुंबईकरांनी कमाल केली. 104 धावांवर जखमी निवृत्त झालेला जैसवाल पुन्हा मैदानात आला आणि त्याने इंग्लिश गोलंदाजांना चोप चोप चोपले. त्याला सरफराजनेही जबरदस्त साथ दिली. त्यांचा खेळ इतका जोरदार होता की, दोघांनी 172 धावांची भागी केली. शेवटच्या सत्रात 16 षटके फलंदाजी करताना दोघांनी 116 धावा ठोकून काढल्या. जैसवालने 22 व्या वर्षी दोन द्विशतके ठोकत विनोद कांबळी आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. या दोघांनीही एकविशीत हा विक्रम केला होता. एवढेच नव्हे तर जैसवालने वसीम अक्रमच्या कसोटी इतिहासातील सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाचीही बरोबरी साधली. 28 वर्षांपूर्वीच्या अक्रमच्या 12 षटकारांची यशस्वीने बरोबरी साधली. त्याने 236 चेंडूंत 14 चौकार आणि 12 षटकार ठोकत नाबाद 214 धावा काढल्या.
विक्रमांवर यशस्वी स्वार 
वसीम अक्रमने 1996 साली झिम्बाब्वेविरुद्ध 257 धावांची खेळी करताना 12 षटकार ठोकले होते. अक्रमने 1933 साली वाली हॅमंड यांनी केलेल्या 10 षटकारांचा विक्रम मोडीत काढला होता. आज यशस्वीला अक्रमच्या 12 षटकारांना मागे टाकण्याची संधी होती, पण डाव घोषित केल्यामुळे तो केवळ बरोबरीच साधू शकला.
पहिली तीन शतके दीडशतकापेक्षा मोठय़ा डावात परावर्तित करणारा जैसवाल हा जगातला सातवा आणि तिसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरला.
बाविशीत दोन द्विशतके ठोकणारा यशस्वी तिसराच तकुण फलंदाज ठरला. हिंदुस्थानच्याच विनोद कांबळीने 21 वर्षे 54 दिवसांचा असताना हा पराक्रम करत सर डॉन ब्रॅडमनच्या 21 वर्षे 318 दिवसांच्या कामगिरीला मागे टाकले होते.
सलग दोन कसोटी सामन्यांत द्विशतके ठोकणारा यशस्वी तिसराच हिंदुस्थानी ठरला. या आधी विनोद कांबळीने (1993) इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध आणि विराट कोहलीने (2017) श्रीलंकेविरुद्ध सलग कसोटीत द्विशतके झळकावली होती.
हिंदुस्थानने राजकोट कसोटीत 28 षटकार (पहिल्या डावात दहा आणि दुसऱया डावात 18 ) ठोकत एका कसोटीत एका संघाकडून सर्वाधिक षटकरांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. 2019 साली विशाखापट्टणम कसोटीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 27 षटकार ठोकले होते. तसे पाहता एका डावात 22 षटकारांचा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. त्यांनी 2014 साली पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता.
हिंदुस्थानने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावांच्या विजयाची नोंद केली. 2021 साली न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला होता. आज तो विक्रम मोडीत काढला. तसेच हा कसोटी इतिहासातील आठवा सर्वात मोठा विजय आहे, तर इंग्लंडचा दुसरा मोठा पराभव आहे. 1934 च्या ओव्हल कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 562 धावांनी पराभव केला होता.
एकाच कसोटीत 5 विकेट आणि शतक ठोकण्याचा विक्रम रवींद्र जाडेजाने दुसऱयांदा केला. अशी कामगिरी सर गॅरी सोबर्स, मुश्ताक मोहम्मद, जॅक पॅलिस आणि शाकिब अल हसन या अष्टपैलूंनीही दोनदा केली आहे. मात्र इयान बॉथम यांनी पाच तर रविचंद्रन अश्विनने हा विक्रम तीनदा केला आहे.
रोहित शर्माचे कसोटी शतक आणि हिंदुस्थानचा विजय हे समीकरण आतापर्यंत 100 टक्के जुळले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. शर्माने आतापर्यंत 11 शतके ठोकली असून प्रत्येकवेळा हिंदुस्थान विजयी ठरला आहे. ट्रव्हिस हेड (7), वॉर्विक ऑर्मस्ट्राँग (6), डॅरेन लेहमन (5) आणि ओली पोप (5) या फलंदाजांनीसुद्धा शतक ठोकले तेव्हा त्यांचे संघ जिंकले आहेत.
हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्ध 33 वा कसोटी विजय नोंदवत एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजयाची नोंद केली. यापैकी मायदेशातील हा 24 वा विजय आहे. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 32 कसोटी विजय नोंदविले असून मायदेशात 23 विजयाची नोंद केली आहे.