यवतमाळ : वऱ्हाडाच्या बसला ट्रकची धडक, दोन सख्ख्या बहिणींसह चार जणांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ येथे जाणाऱ्या पाहुण्यांच्या उभ्या बसला वाटखेडजवळ ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात 4 जण ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी आहेत. मयतांमध्ये सख्ख्या बहिणींचा समावेश आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या लोहारा परिसरातील राऊत यांच्या मुलीचे लग्न खैरी येथील अनिकेत ताजने या युवकाशी पार पडले. या विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ खैरी (ता. राळेगाव) येथे आयोजित करण्यात आला होता. पाहुणे रात्री उशिरा परतत असताना राळेगाव-कळंब मार्गावरील वाटखेड गावाजवळ स्कूल बसचे टायर पंक्चर झाले. दुरुस्तीसाठी हे वाहन थांबल्यानंतर काही पाहुणे खाली उतरले होते. तर काही पाहुणे बसमध्ये बसले होते. पंक्चर काढण्याचे काम सुरू असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकची उभ्या स्कूल बसला जबर धडक बसली.

या भीषण अपघातानंतर घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी जखमींना उपचारासाठी तत्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र , श्रावणी गजानन भोयर (12) परी गजानन भोयर (10) या दोन सख्ख्या बहिणी, तर लिलाबाई पातुरकर (55) आणि निलेश छापेकर (35) यांचा मृत्यू झाला.या अपघातात 6 जण जखमी झाले आहे . त्यांच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

या घटनेची माहिती राळेगाव येथील स्थानिकांनी पोलिसांनी दिली. सचिन दरणे, शशिकांत धुमाळ, वसीम पठाण यांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना आणले. याप्रकरणी ट्रकचालक गजानन . गजाजन बढिये (रा. आर्णी) याला राळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव हे करित आहेत.