‘तुम्ही फोन घेतला नाही, माझ्या आईचा मृत्यू झाला’; मिठू जाधव यांनी सुजय विखे यांना भर सभेत सुनावले

कोरोना संकट काळात माझी आई आजारी पडल्यानंतर उपचारासाठी मी तुमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला, तुम्हालाही फोन केला. तुम्ही फोनच घेतला नाही. त्यामुळे उपचाराअभावी माझ्या आईचा मृत्यू झाल्याचे सांगत देउळगाव सिध्दी येथे झालेल्या सभेमध्ये स्थानिक नागरीक मिठू जाधव यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना खडे बोल सुनावले.

लोकसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ देउळगावसिध्दी येथे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू होऊन काही वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर नागरीकांना बोलयचे आहे का, अशी विचारणा करण्यात आल्यानंतर मिठू जाधव यांनी हातात माईक घेत आपली कैफियत मांडण्यास सुरूवात केली.

जाधव म्हणाले, माझ्या आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. या आजारातून ती बरी झाल्यानंतर ती पुन्हा आजारी पडली. आईवर उपचार करण्यासाठी जाधव यांनी देउळगावसिध्दी येथील विखे समर्थक कार्यकर्त्याशी संपर्क केला. त्या कार्यकर्त्याने आपली फारशी ओळख नाही. दुसऱ्या कार्यकर्त्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. जाधव यांनी दुसऱ्या कार्यकर्त्याशी संपर्क केला असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. माझा काही सबंध नाही, विळद घाटत गर्दी आहे असे सांगत दुसऱ्या कार्यकर्त्याकडूनही मदत मिळाली नाही.

मिठू जाधव यांनी डॉ. सुजय विखे यांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. विखे यांनीही जाधव यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने मिठू जाधव यांच्या आईचा मृत्यू झाला. अशी कैफियत जाधव हे मांडत असताना विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘मध्ये बोलू नका, मला बोलू द्या’ असे जाधव म्हणाले. मात्र, जाधव यांच्या हातातील माईक काढून घेण्यात आला आणि पुढील भाषणे सुरू करण्यात आली.

जाधव यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल
जाधव कैफियत मांडत असताना अनेकांनी त्याचे व्हिडीओ चित्रण केले. ही बाब लक्षात आल्यानंतर शिवाजी कर्डीले यांच्या सुचनेनुसार ज्यांनी छायाचित्रण केले त्यांच्या मोबाईलमधील छायाचित्रण सक्तीने डिलीट करण्यात आले. मात्र, काही कार्यकर्त्यांनी डिलीट केलेला हा व्हिडीओ रीसायकलबीन मधून पुन्हा रिस्टोअर केला आणि तो व्हिडीओ संपूर्ण जिल्हयात व्हायरल झाला.

विखे यांना रोषाला सामोरे जावे लागतेय
गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील अनेक गावांशी संपर्क न ठेवल्यामुळे, विकास कामांची दिलेली अश्‍वासने पुर्ण न केल्याने विखे यांना अनेकदा नागरीकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. देऊळगाव सिद्धी येथील मिठू जाधव यांच्या आईला उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने कोरोना काळात विखे यांनी लोकांना मदत केल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जात असलेल्या दाव्याचा फोलपणा उघड झाला आहे.