तरुणीकडून शेअर बाजारात फसवणूक, तरुणाने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नासाठी मागणी घातलेल्या तरुणीने फसवणूक केली शिवाय जास्त पैसे मिळवण्याच्या नादात शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत नुकसान झाले म्हणून एका तरुणाने प्रवरा संगम येथील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.

समाजातून झालेल्या या फसवणुकीला मी कंटाळलो असलो तरी तिला मात्र माझ्या मृत्यूला जबाबदार धरू नका, अशी विनंती करणारे पत्र या तरुणाने लिहिले आहे. मयत देवेंद्र यांचे चुलते महेश बाबुराव थोरात यांनी नेवासा पोलीस ठाण्यात याविषयी माहिती दिली. त्यांनी असे म्हटले की, माझा मोठा भाऊ मोहिनीराज थोरात याने सोमवारी कळवले की, मुलगा देवेंद्र घरात नाही त्याबद्दल चौकशी केली असता देवेंद्र एका मित्राची मोटरसायकल घेऊन प्रवारासंगमकडे गेल्याचे समजले. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता मोटरसायकल सापडली, मात्र देवेंद्र सापडला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर 24 तासांनंतर देवेंद्रचा मृतदेह सापडला. आत्महत्या करण्यापूर्वी देवेंद्रने लिहिलेल्या पत्रामुळे त्याच्या मृत्यूचे कारण पोलिसांना आणि कुटुंबियांना समजले.

नेवासा येथील एका तरुणाचे एका महाविद्यालयीन तरुणीबरोबर प्रेम संबंध जुळले, कारण मुलीने स्वतः लग्नासाठी मागणी घातली. त्या तरुणाने तिचे सगळे हट्ट पुरवले. ती तरुणी प्रेमाचे खोटे नाटक करत आहे, हे त्याच्या लक्षात आले नाही. तिचे हट्ट पुरवण्यासाठी जास्तीचे पैसे शेअर मार्केटमध्ये मिळतील म्हणून त्या ठिकाणी पैसे गुंतवले, मात्र तेथे त्याची फसगत झाली. तो कर्जबाजारी झाला.

तरुणीने प्रेमाचे खोटे नाटक करून फसवले आणि शेअर बाजारात झालेल्या फसवणूक या दोन्ही कारणामुळे तरुणाने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. तरुणाचा मृतदेह सापडला पोलिसांनी शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तो त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्रची आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.