
अल्कोहोल व ड्रग्जचे सेवन तरुणांमध्ये सामान्य बाब झाली आहे आणि त्यांना त्याच्या परिणामांची अजिबात जाणीव नाही. असे असले तरी तरुणांना सुधारण्याची एक संधी द्यायला हवी, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने दोघा तरुणांचा जामीनअर्ज नुकताच मंजूर केला. हा जामीन मंजूर करतानाच न्यायालयाने त्या दोघा तरुणांना सक्त ताकीदही दिली, ड्रग्स सेवन करताना यापुढे आढळून आलात तर याद राखा. कोणतीही दया न दाखवता जामीन थेट रद्द केला जाईल, असे न्यायमूर्तींनी बजावले.
इगतपुरी येथील बंगल्यात मित्राच्या बर्थडे पार्टीत ड्रग्स सेवन करताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी काही जणांना पकडले. छापा मारल्यानंतर बंगल्याच्या स्विमिंग पूलमध्ये टाकून देण्यात आलेले कोकेन, गांजा आणि चरस पोलिसांना सापडले. त्यामुळे पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यापैकी दोघा तरुणांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. प्रथमदर्शनी असे दिसून येत आहे की, पोलीस एनडीपीएस कायद्याच्या कलम 50अंतर्गत कार्यपद्धतींचे पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. याशिवाय जप्त करण्यात आलेले ड्रग्सची मात्रा दर्शविण्यासाठी कोणतीही सामग्री नव्हती, असे निरीक्षण न्यायमूर्तीनी नोंदवले.
























































