रत्नागिरीत अन्न व औषध प्रशासनाची दोन बेकरींवर कारवाई

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने रत्नागिरीतील दोन बेकरी उद्योगांवर कारवाई केली. या दोन्ही बेकऱ्यांचा परवाना काही काळ स्थगित करून त्यांना स्वच्छतेसंबंधी काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी दिली.

रत्नागिरी शहरातील गुडलक बेकरी आणि मिरजोळे येथील रॉयल बेकरीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या बेकरींवर धडक कारवाई केली. त्याठिकाणी आवश्यक अशी स्वच्छतेबाबतची काळजी घेतली गेली नव्हती. या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दोन्ही बेकरींना स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत त्यांना व्यवसाय सुरु ठेवता येणार नाही. अन्न व औषध प्रशासन पुन्हा फेरतपासणी करेल आणि मगच त्यांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल.