शिरीष पै

>>माधव डोळे<<

शिरीष पै नावाचं काव्यप्रतिभेने बहरलेलं झाड अखेर कोसळलं. अर्थात या झाडाला आलेल्या फुलांचा सुगंध यापुढेही दरवळतच राहणार आहे. लहानपणीच त्यांच्यावर संस्कार झाले ते वडील आचार्य अत्रे यांचे. साप्ताहिक ‘नवयुग’ आणि भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या दैनिक ‘मराठा’चे कार्यालय म्हणजे शिरीष पै यांचे जणू विद्यापीठच होते. सरळ, साधी, पण सर्वसामान्य वाचकांशी संवाद साधणारी शैली कशी असावी याचे धडेदेखील याच विद्यापीठात मिळाले. खरे तर आचार्य अत्रे नावाच्या वादळाबरोबर काम करणे हे भल्याभल्यांना अवघड गेले, पण शिरीषताईंनी आपल्या लाडक्या पप्पांना समर्थपणे साथ दिली. आपल्या मुलीमधील लेखनाचे गुण लक्षात येताच त्यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले. सध्याच्या सोशल नेटवर्किंग जमान्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्यातील आचार्य अत्र्यांचे योगदान तरुण पिढीला फारसे माहीत नाही. शिरीष पै यांचादेखील या चळवळीत विविध मार्गांनी सहभाग होता. १९५५ मध्ये मुंबईत संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला आणि ‘नवयुग’ या साप्ताहिकाचे स्वरूप बदलले. ‘नवयुग’च्या संपादनात शिरीष पैंचा मोठा वाटा होता. दत्तू बांदेकरांचे ‘रविवारचा मोरावळा’ हे सदर पहिल्या पानावर प्रसिद्ध व्हायचे. त्याचप्रमाणे त्या काळातील अनेक राजकारण्यांना घाम फोडणारी शिवसेनाप्रमुखांची व्यंगचित्रेदेखील पहिल्याच पानावर छापली जायची. ही व्यंगचित्रे शिवसेनाप्रमुखांच्या घरी जाऊन आणण्याची जबाबदारी संपादक आचार्य अत्रे यांनी शिरीष पैंवर सोपवली होती. अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीयांशी जिव्हाळय़ाचे नाते होते. हे नाते शिरीष पै यांनीदेखील शेवटपर्यंत जपले. शिरीष पै यांचे संपूर्ण जीवन आदर्शवत होते. धडाडीच्या पत्रकार, लेखिका, कवयित्री, नाटककार, संपादक, कथाकार असे त्यांचे अनेक पैलू सांगता येतील. विविध वादळांशी त्यांनी दोन हात केले, पण शेवटच्या श्वासापर्यंत लेखनाशी त्या प्रामाणिक राहिल्या. मुंबईतील महाविद्यालयात एल.एल.बी.चे शिक्षण घेतले. तेथेच त्यांना व्यंकटेश पै हे जीवनसाथी लाभले. सुमारे ७५हून अधिक वर्षे त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले. ६० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. ‘अत्रे थिएटर्स’साठी चार नाटकेदेखील लिहिली.  वयाच्या नवव्या वर्षी ‘बालिका दर्श’ या मासिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. पत्रकारितेबरोबरच त्यांचे कवितेशी नाते जोडले गेले तेही कायमचे. आचार्य अत्रे यांनी दाखवलेल्या वाटेवरून त्यांचा लेखनाचा प्रवास सुरू राहिला. तरीही अत्रेंच्या लिखाणाची छाप त्यांच्यावर पडली नाही. कालांतराने पै यांनी स्वतःची लालित्यपूर्ण व तरल शैली निर्माण केली. मराठी कवितेच्या प्रवासात शिरीष पै यांचे योगदान कोणालाच विसरता येणार नाही. कवितेचे त्यांनी सर्व प्रकार हाताळले. मात्र त्या लक्षात राहिल्या ‘हायकू’ या काव्यप्रकारामुळे. हा मूळचा जपानी काव्यप्रकार. हिंदुस्थानात पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांनी ‘हायकू’ लिहिला. मात्र मराठीमध्ये ‘हायकू’ हा काव्यप्रकार आणण्याचा बहुमान शिरीष पै यांच्याकडे जातो. ‘हायकू’ हाच त्यांचा श्वास व ध्यास बनला. निसर्ग आणि माणूस यांचे हळुवार नाते आपल्या मखमली शब्दांतून त्या फुलवायच्या. केवळ तीन ओळीतून आकाशाएवढा अर्थ व्यक्त करण्याची जबरदस्त ताकद शिरीषताईंच्या ‘हायकू’त दिसते. त्यांनी केवळ हा प्रकार लिहिला नाही तर मराठीतील अनेक कवींना याबाबतचे मार्गदर्शन केले. सुमारे २० कवितासंग्रह प्रकाशित झाले. विपुल साहित्यनिर्मिती करूनदेखील शिरीष पै यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळू शकले नाही. अर्थात त्यांना त्याची कधीही खंत वाटली नाही. शिरीष पै यांचे आपल्या वडिलांवर एवढे प्रेम होते की, त्यांना भेटायला कुणीही गेले तरी अत्रे साहेबांच्या आठवणी निघायच्या. अत्रे शिरीषताईंना लाडाने नानी असे हाक मारायचे. शिरीषताईंचे मराठी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील. ‘मराठा’ तसेच ‘नवयुग’मुळे शिरीष पै यांना अनेक लेखक व कवयित्रींचा सहवास लाभला. १३ जून १९६९ रोजी आचार्य अत्रे यांचे निधन झाल्यानंतर दैनिक ‘मराठा’चा डोलारा शिरीष पै व त्यांचे पती व्यंकटेश यांनी यांनी सहा वर्षे अतिशय समर्थपणे सांभाळला. दुर्दैवाने कर्जाचा डोंगर व अनेक संकटांमुळे ‘मराठा’ बंद पडला. मात्र ‘मराठा’ नावाच्या तलवारीची धार आचार्य अत्रे यांची कन्या असलेल्या शिरीषताईंनी अखेरपर्यंत तळपती ठेवली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात अत्र्यांची लेखणी व वाणी आग ओकत होती. त्यात अनेक जण जळून खाक झाले. अत्रे तुरुंगात होते तेव्हा ‘मराठा’ची जबाबदारी शिरीष पै यांच्यावर होती. त्या स्वतः जेवणाचा डबा घेऊन तुरुंगात जायच्या आणि रिकाम्या डब्यात आचार्य अत्रे अग्रलेखाचे कागद भरून पाठवायचे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ‘मराठा’मध्ये अत्र्यांचा अग्रलेख छापून यायचा. संपादक तुरुंगात असतानाही अग्रलेख कोण लिहितो याचे अनेकांना आश्चर्य वाटायचे, पण शिरीष पै यांनी तुरुंगात जेवणाचा डबा घेऊन जाण्याचे केलेले धाडस लाखमोलाचे आहे. अशा अनेक कसोटीच्या प्रसंगांना शिरीषताई सामोऱ्या गेल्या. मात्र मृत्यूचे संकट त्यांना टाळता आले नाही. त्यांच्या जाण्याने ‘शिरीष’ ऋतू कायमचा संपला.

एका कवितेत त्या म्हणतात :

तुला देताना निरोप

डोळे आलेत भरून

रंग तुझा घननीळ

घेते मनी साठवून