
चंद्रपूरातील पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कसरगट्टा बिटातील कविटबोळी शेतशिवारात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. कसरगठ्ठा येथील बेबिबाई हनुमान धोडरे वय 55 वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे.
कसरगट्टा गावालगत असलेल्या कविठबोळी शेतशिवार सर्वे नंबर 55 मध्ये गंगाराम मोहन धोडरे यांच्या शेतात सदर महिला कापूस वेचण्याकरीता मजूरी करण्यासाठी गेली होती. दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सदर महिलेवर हल्ला चढवून तिला ठार केले. सदर घटनेची माहिती वनअधिकाऱ्यांना मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे पाठविण्यात आला. सदर महिलेच्या पश्चात पती, मुलगा, सून नातवंड आहेत.
वाघाचे आणखी किती बळी
पोंभुर्णा तालुक्यात वाघाच्या हल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यात निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मागील काही दिवसांपासून पोंभुर्णा जवळपास असलेल्या कविटबोळी येथे वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना होत होते. वाघाने दोन दिवसांपुर्वी दोन बैलांला ठार केले होते. याची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. परंतु वनविभागाने वेळीच लक्ष न दिल्याने सदर घटना घडल्याचे गावकरी बोलत आहेत. या नरभक्षक वाघाचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

























































